(म्हणे) ‘मोदी सरकारविरुद्ध जनतेमध्ये असलेल्या अप्रसन्नतेवरून लक्ष हटवण्यासाठी समान नागरी कायद्याचा प्रस्ताव !’ – शरद पवार

पुणे – देशातील जनतेमध्ये मोदी सरकारच्या विरोधात अप्रसन्नता आणि अस्वस्थता आहे. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी समान नागरी कायद्याचा प्रस्ताव आणण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायद्यावरून विरोधी पक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ते येथील एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

पवार पुढे म्हणाले की, समान नागरी कायद्यावर शीख, ख्रिस्ती, जैन यांची भूमिका काय आहे ? हे स्पष्ट होेणे आवश्यक आहे. मला काळजी एका गोष्टीची आहे की, शीख धर्मात समान नागरी कायद्याविषयी वेगळे मत आहे, असे माझ्या कानावर आले आहे. शीख धर्मियांची मनस्थिती या कायद्याला पाठिंबा देण्याची नाही. (असे शीख धर्मातील कुणी अधिकारी व्यक्ती अथवा दायित्व असलेल्या व्यक्तीने म्हटले आहे ? कि शरद पवार मोघम सांगत आहेत ?, हे स्पष्ट झाले पाहिजे ! – संपादक)