गोव्यात मागील ६ मासांत ४ सहस्र ७०० हून अधिक वाहनधारकांची अनुज्ञप्ती तात्पुरती रहित

वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्याची प्रकरणे

वाहतुकीचे नियम भंग

पणजी, २९ जून (वार्ता.) – वर्ष २०२३ मध्ये प्रारंभीच्या ६ मासांत वाहतुकीचे नियम भंग केल्याच्या प्रकरणी अनुज्ञप्ती निलंबित करण्याविषयीच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार जानेवारी ते जून २०२३ या ६ मासांच्या कालावधीत एकूण ४ सहस्र ७५६ वाहनधारकांची अनुज्ञप्ती निलंबित (तात्पुरती रहित) करण्यात आली आहे. वर्ष २०२२ मध्ये नोंद करण्यात आलेल्या पूर्ण वर्षातील वाहतुकीच्या नियमांचा भंग झालेल्या प्रकरणांपेक्षा ही संख्या अधिक आहे. वाहतूक नियमांचा भंग करण्याविषयीच्या गुन्ह्यांमध्ये लाल दिवा असतांनाही तसेच पुढे जाणे, वाहनाच्या गतीची मर्यादा ओलांडणे, वाहन चालवतांना भ्रमणभाषवर बोलणे, मद्यपान करून वाहन चालवणे, हेल्मेट न घालता वाहन चालवणे इत्यादी गुन्ह्यांचा समावेश आहे. याखेरीज माल वाहतूक करणार्‍या वाहनांमध्ये अधिक माल भरणे, मालवाहतूक वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. अनुज्ञप्ती निलंबित होण्याच्या या वाढत्या प्रकरणांचा विचार केला, तर गोव्यात वाहतूक नियमांचे कडक पालन करणे आणि उत्तरदायित्व घेऊन वाहन चालवणे याविषयीची जागृती करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. याविषयी वाहतूक खात्याने योग्य उपाययोजना करून रस्ता सुरक्षा वाढवण्याची आवश्यकता आहे.

संपादकीय भूमिका

दंड वाढवूनही नागरिक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, याचाच अर्थ नागरिकांमध्ये नीतीमत्ता नाही. त्यामुळे शालेय शिक्षणापासूनच नीतीमूल्यांचे शिक्षण आणि साधना शिकवणे आवश्यक !