‘लव्‍ह जिहाद’सारख्‍या गुन्‍ह्यांवर पोलीस यंत्रणेने तात्‍काळ कारवाई केली पाहिजे !

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची पुण्‍यातील पत्रकार परिषदेत मागणी

प्रतिकात्मक चित्र

पुणे, २७ जून (वार्ता.) – ‘लव्‍ह जिहाद’सारख्‍या घटनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. अशा स्‍वरूपाच्‍या घटना समाजामध्‍ये मोठ्या प्रमाणामध्‍ये घडत आहेत. या तक्रारींवर पोलिसांनी तात्‍काळ कारवाई केली पाहिजे; परंतु दुर्दैवाने पोलीस यंत्रणा याकडे गांभीर्याने पहात नाही. कोल्‍हापूर आणि अहिल्‍यानगर येथील घटनांमध्‍ये पोलीस आयुक्‍तांनी लक्ष घालून पीडितेला न्‍याय द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ते २७ जून या दिवशी शिवाजीनगर येथील भारतीय जनता पक्षाच्‍या कार्यालयामध्‍ये आयोजित केलेल्‍या पत्रकार परिषदेमध्‍ये बोलत होते. या वेळी कोल्‍हापूर आणि अहिल्‍यानगर येथील पीडित तरुणीही पत्रकार परिषदेमध्‍ये उपस्‍थित होत्‍या.

पडळकर यांनी पत्रकार परिषदेमध्‍ये मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर

१. कोल्‍हापूर येथील प्रकरणामधील १६ वर्षीय अल्‍पवयीन मुलीवर एका मुसलमान तरुणाने अत्‍याचार केले. तिला फसवून पळवून नेले. तिच्‍यासह घरच्‍यांना जिवे मारण्‍याच्‍या धमक्‍या दिल्‍या. संबंधित मुलावर दोनवेळा गुन्‍हा नोंद झालेला असतांनाही तो मोकाट सुटलेला आहे. पोलिसांनी त्‍या आरोपींवर वेळीच कारवाई केली असती तर पुढील अनर्थ टळला असता.

२. अहिल्‍यानगर येथील घटनाही तशीच आहे. त्‍याही मुलीला फसवून, तिच्‍यावर अत्‍याचार केले. या दोन्‍हींही घटनांमध्‍ये पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

३. ‘लव्‍ह जिहाद’च्‍या माध्‍यमातून अनेक हिंदू मुलींना लक्ष्य केले जात आहे. फसवून, काही वेळेस जबरदस्‍ती करून त्‍यांच्‍यावर अत्‍याचार केले जात आहेत. आज या उपस्‍थित असलेल्‍या मुलींचे कौतूक करतो की, त्‍यांनी समाजासमोर येऊन आपली व्‍यथा मांडली.

४. २७ जून या दिवशी सकाळी शनिवार पेठेमध्‍ये एका तरुणीवर कोयत्‍याने आक्रमण झालेल्‍या घटनेवर बोलतांना पडळकर म्‍हणाले की, एम्.पी.एस्.सी. करत असलेल्‍या तरुणींवर जीवघेणे आक्रमण होणे ही अतिशय गंभीर घटना आहे. दर्शना पवार हिची हत्‍या केलेल्‍या तिच्‍या मित्राला पोलिसांनी तात्‍काळ अटक केली आहे, तसेच या आक्रमण प्रकरणीतील तरुणावर पोलीस कारवाई करून त्‍याला शिक्षा मिळेल.