२ वेळा घ्यावा लागला दीक्षांत समारंभ !
छत्रपती सांभाजीनगर – येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठामध्ये २७ जून या दिवशी आयोजित केलेल्या ६३ व्या दीक्षांत समारंभात मंचावर बोलावून पदवी प्रमाणपत्र दिले नसल्याचे कारण पुढे करत पी.एच्.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी गदारोळ घातला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला २ वेळा पदवीदान समारंभ घेण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे राष्ट्रगीत संपल्यानंतर पुन्हा मंचावरून पदवीदान करण्यात आली.
शैक्षणिक सत्र २०२२ मधील विद्यार्थ्यांना ६३ व्या दीक्षांत समारंभात पदवी देण्यात आली; मात्र या समारंभात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना जागेवरच पदवी देण्यात आली होती. त्यामुळे दीक्षांत समारंभ संपल्यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले. त्यानंतर राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी दीक्षांत सोहळा संपल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सभागृहात पी.एच्.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास प्रारंभ केला.
कुलगुरु प्रमोद येवले आणि दीक्षांत समारंभाच्या पाहुण्या पंकज मित्तल यांना काही काळ सभागृहात काय चालू आहे हे कळलेच नाही. काही विद्यार्थी जोरजोरात ओरडून ‘हा पी.एच्.डी. पदवीचा अवमान आहे. आम्हाला जागेवरूनच पदवी प्रदान करायची होती, तर आम्हाला बोलावले कशाला ?’, असा जाब विचारण्यास प्रारंभ केला.
सूत्रसंचालन करणार्या मस्तजिब् खान यांनी कुलगुरूंची पूर्वअनुमती घेऊन पुन्हा एकदा पदवी देण्याची घोषणा केली. त्यानंतर कुलगुरु डॉक्टर मित्तल, चारही विद्याशाखांच्या अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषद सदस्य मंचावर आले. दीड वाजता पुन्हा पदवीदान सोहळा चालू झाला.