भारतातून चोरलेल्या १०० हून अधिक प्राचीन कलाकृती अमेरिका परत करणार !

नवी देहली – भारतातून चोरी करून अमेरिकेत नेण्यात आलेल्या १०० हून अधिक कलाकृती अमेरिका भारताला परत करणार आहे. अमेरिकेच्या दौर्‍यावर असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अमेरिकेकडून याविषयी घोषणा करण्यात आली. यावर पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या विदेश दौर्‍यांमुळे आतापर्यंत शेकडो भारतीय कलाकृती विदेशातून परत आणण्यात आल्या आहेत. वर्ष २०२२ मध्ये अमेरिकेने ३०७ कलाकृती भारताला परत केल्या होत्या. या तस्करांनी अमेरिकेत नेल्या होत्या. याचे मूल्य ३३ कोटी रुपये इतके होते. यातील बहुतांश कलाकृती तस्कर सुभाष कपूर याने भारतातून चोरी करून नेल्या होत्या. त्याने भारताव्यतिरिक्त अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, थायलँड, कंबोडिया, इंडोनेशिया आणि अन्य देशांमधूनही कलाकृतींची तस्करी केली होती.

गूगल, अ‍ॅमेझॉन आदी आस्थापने भारतात गुंतवणूक करणार !

पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिकेच्या दौर्‍याच्या वेळी गूगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमेझॉन आदी आस्थापनांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची भेट घेतली होती. त्या वेळी या अधिकार्‍यांनी भारतात गुंतवणूक करण्याची घोषणा केली. गूगलकडून ९१ सहस्र ९५७ कोटी रुपयांची, अ‍ॅमेझॉनने १ लाख २३ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याचे सांगितले.

संपादकीय भूमिका

एवढ्या कलाकृती देशाच्या बाहेर गेल्याच कशा ? पुरातत्व विभाग झोपला होता का ? भारताच्या ऐतिहासिक आणि प्राचीन वस्तूंचे जतन करण्यात सातत्याने अपयशी ठरलेला पुरातत्व विभाग विसर्जित करून राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी पुरातत्व विशेषज्ञांची नेमणूक करणे आवश्यक !