मणीपूरमध्ये प्रतिबंधित संघटनेच्या १२ जणांची जमावाच्या दबावामुळे करावी लागली सुटका !

इंफाळ (मणीपूर) – मणीपूरमध्ये गेल्या ५४ दिवसांपासून हिंसाचार चालूच आहे. २४ जून या दिवशी १ सहस्र २०० हून अधिक स्थानिक महिलांनी सुरक्षादलांनी कह्यात घेतलेल्या ‘कांगलेई यावोल कन्ना लुप’ (के.वाय.के.एल्.) या संघटनेच्या १२ जणांची सुटका करवून घेतली. तसेच त्यांच्या दबावामुळे सुरक्षादलांनी चालू केलेली शोधमोहीमही थांबवावी लागली. या वेळी महिलांना इजा होऊ नये, यासाठी सुरक्षादलांनी त्यांच्यावर कोणतही कारवाई केली नाही. के.वाय.के.एल्. या संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे.

संरक्षण खात्याच्या जनसंपर्क अधिकार्‍याने सांगितले की, इथम गावात गुप्तचरांच्या माहितीनंतर सैन्याने शोधमोहीम चालू केली होती. लोकांना कोणतीही अडचण येऊ नये; म्हणून संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली होती. सुरक्षादलांनी येथून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. तसेच के.वाय.के.एल्.च्या कार्यकर्त्यांना अटक केली. याची माहिती मिळाल्यावर मोठ्या प्रमाणात महिला तेथे पोचल्या आणि त्यांनी सैन्यावर दबाव टाकून कार्यकर्त्यांना सोडण्यास भाग पाडले.

मणीपूरमध्ये आतापर्यंत १२० लोक ठार, तर ३ सहस्रांहून अधिक लोक घायाळ

मणीपूरमध्ये जातीय हिंसाचारात आतापर्यंत १२० लोकांचा मृत्यू झाला आहे. ३ सहस्रांहून अधिक लोक घायाळ झाले आहेत. या संदर्भात २४ जून या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वपक्षीय बैठकही घेतली होती. परिस्थिती हाताळण्यासाठी ४० आय.पी.एस् अधिकारी आणि ३६ सहस्र सुरक्षा कर्मचारी राज्यात तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.