गोवंशियांची कत्तल करणार्‍या आरोपींना ३ वर्षे हद्दपार करण्‍याची बजरंग दलाची मागणी !

निवेदन देतांना बजरंग दलाचे कार्यकर्ते

नगर – संगमनेर शहर आणि परिसरात प्रतिदिन शेकडो गायींची कत्तल होत असून यामध्‍ये कत्तल करणारे तेच-तेच आरोपी असून त्‍यांच्‍यावर संघटित गुन्‍हेगारी करणे, मुंबई पोलीस अधिनियम कलमान्‍वये अन् मोक्‍का कायद्याच्‍या अंतर्गत ३ वर्षे तडीपार करण्‍याचे आदेश देण्‍यात यावेत, या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना २२ जून २०२३ या दिवशी देण्‍यात आले, तसेच गोवंश संदर्भातील सर्व प्रथम माहिती अहवाल उपविभागीय अधिकारी यांना या वेळी सादर करण्‍यात आला. आरोपींना ३ वर्षे तडीपार करण्‍यात आले, तर त्‍यांना कायद्याचा धाक बसेल आणि अवैध पशूवधगृहे बंद होतील, अशी अपेक्षा या वेळी संघटनेकडून करण्‍यात आली.

निवेदन देतांना विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्‍हा सहमंत्री विशाल वाकचौरे आणि गोपाल राठी, विहिंप धर्म प्रसारचे जिल्‍हा प्रमुख प्रशांत बेल्‍हेकर, बजरंग दलाचे विभाग संयोजक सचिन कानकाटे, प्रखंड संयोजक कुलदीप ठाकूर, शहर संयोजक शुभम कपिले, ओंकार भालेराव, अनिकेत पवार, दीपक मेहत्रे इत्‍यादी उपस्‍थित होते.

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्‍वतःहून असे निर्णय का घेत नाही ?