भांबेड (लांजा-रत्नागिरी) येथील डॉक्टर श्रीधर ठाकूर यांना ‘अपरान्त भूषण’ पुरस्कार घोषित

डॉक्टर श्रीधर ठाकूर

चिपळूण – माझे शिक्षण मला फारसे भावले नाही. माझे खरे शिक्षण मी डॉक्टर झाल्यानंतर झालेले आहे. वैद्यकीय शिक्षणानंतर समाजात वावरत असतांना मला जे ज्ञान मिळाले त्यातून आजचा ‘मी’ घडलेलो आहे, अशी भूमिका मांडणार्‍या वैद्यकीय व्यवस्थापन शास्त्रतज्ञ आणि ‘इन्फिगो आय केअर हॉस्पिटल ग्रुप’चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. श्रीधर ठाकूर यांना चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘अपरान्त भूषण’ पुरस्कार घोषित झाला आहे. डॉ. ठाकूर हे मागील ३ दशकांहून अधिक काळ वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ते जागतिक संदर्भ असलेल्या ‘उत्कृष्ट बॉटनिकल गार्डन’चे निर्माते आणि संग्राहक आहेत. अनेक आव्हाने आणि   कमतरता यांचा सामना करत, कामाच्या निमित्ताने भ्रमंती करत, मिळालेल्या अनुभवातून शिकत गेलेले डॉ. ठाकूर हे जगभरात पोचलेले अस्सल कोकणी व्यक्तीमत्त्व आहे.

वैचारिक समृद्धतेचं दर्शन’ घडवणारा डॉ. ठाकूर यांच्यासमवेतचा संवाद

‘आपल्या आजूबाजूची लोक, समाजासाठी कसे काम करतात? हे आपण शिकत गेलो आणि तसे काम करू लागलो, तर समाज आपल्याला स्वीकारतो. समाजाच्या दृष्टीने आपण मोठे होतो. मोठ्या माणसांची ही प्रतिमा समाजानेच तयार केलेली आहे. म्हणून आपण काय? आणि किती शिकलो आहोत? यापेक्षा ठराविक शिक्षणानंतर समाजात काम करतांना डोळसपणे, ज्ञानेंद्रिये उघडी ठेवून वावरलो, तर त्यातून खरे शिक्षण मिळते, ते महत्त्वाचे असते. याच शिक्षणातून आपले बहुश्रुत व्यक्तीमत्त्व आकाराला येते. आपण हे जे समाजातून शिकतो त्याचा उपयोग खर्‍या अर्थाने आपल्या माध्यमातून समाजाला होतो. महाविद्यालयीन शिक्षणाचा उपयोग आपल्याला स्वतःपुरता होतो. अशी भूमिका मांडणारे आणि ‘रत्नागिरीत तिसर्‍या चौथ्या इयत्तेत शिकत असतांना, खेळायच्या वयात नगर वाचनालयात जाऊन मुक्तद्वार विभागात २-२ तास वाचनात घालवणारे, घडण्याच्या वयात अकरावी-बारावीला चिपळूणला जगण्याची पहिली पायरी मी चढलो’ असे प्रतिपादन करणारे डॉ. ठाकूर यांच्यासमवेतचा संवाद हा ‘त्यांनी जगभरातील संचारातून मिळवलेल्या आणि अनुभवातून आलेल्या वैचारिक समृद्धतेचं दर्शन’ घडवणारा असतो.

‘इन्फिगो’ची सेवा भविष्यात कोकणातल्या प्रत्येक तालुक्यात उपलब्ध करून देण्याचा मानस

भारतात डोळ्यांच्या उपचारासह जगभरात मल्टिस्पेशालिटी स्वरूपाची किमान सव्वा दोनशे रुग्णालये उभी करणार्‍या डॉ. ठाकूर यांचा बांगलादेश, श्रीलंका, बर्मा, थायलंड, गल्फ कंट्रीज, साऊथ आफ्रिका आदी असंख्य देशात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात विशेष सहभाग राहिलेला आहे. तळागाळातील लोकांपर्यंत लवकर पोचता येईल, अशी वैद्यकीय क्षेत्रातील सेवा कोणती? असा विचार करून त्यांनी महाराष्ट्रात ‘इन्फिगो आय केअर’ नावाने डोळ्यांच्या दवाखान्यांची शृंखला निर्माण केली आहे. आपल्याकडे डोळ्यांचे उपचार करणारे डॉक्टर संख्येने अल्प आहेत. त्यातही अनुभवी डॉक्टरांची आवश्यकता आहे. अनुभव हा, रुग्ण डॉक्टरांबद्दल बोलतो तेव्हा तयार होत जातो. असे कठीणतम स्थिती हाताळण्याचा पुरेसा अनुभव असलेले गुणवत्तेचे डॉक्टर हे त्यांच्या ‘इन्फिगो’चे वैशिष्ट्य आहे.

या सार्‍या प्रयत्नातून ते रत्नागिरी जिल्ह्याची वैद्यकीय सुविधेतील गुणवत्ता उंचावण्याचाही प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे, इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या पंधराव्या हॉस्पिटलचे उद्घाटन रत्नागिरीत कोरोनाच्या कालावधीत झाले होते. मानवी शरिरातल्या एकूण ऊर्जेपैकी सर्वाधिक ऊर्जा डोळ्यांसाठी खर्च होत असते. इतके डोळ्यांचे महत्त्व असूनही डोळ्यांकडे सर्वाधिक दुर्लक्ष केले जाते. याचा विचार करून त्यांनी महाराष्ट्रात चालू केलेल्या ‘इन्फिगो’ची सेवा भविष्यात कोकणातल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.

डॉ. ठाकूर हे मूळचे भांबेड (ता. लांजा) इथले रहिवासी आहेत. त्यांनी रत्नागिरीच्या शिर्के प्रशालेत माध्यमिक, वर्ष १९८३ मध्ये चिपळूणच्या डी.बी.जे. महाविद्यालयात उच्च महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या क्रमांकाने पूर्ण केले होते. पुढे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंकेमध्ये पाठवलेल्या शांतीसेनेतून वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी श्रीलंकेत जाण्याची संधी मिळाली होती.

१७०० हून अधिक वेगवेगळ्या वनस्पतींची उत्कृष्ट बाग

प्रतिकात्मक चित्र

जगभरातल्या भ्रमंतीमधून नियमितपणे वेळ काढून डॉ. ठाकूर यांनी भांबेडमधल्या घराच्या आवारात बारा एकर जमिनीवर, सुमारे १७०० हून अधिक वेगवेगळ्या वनस्पती जोपासत वनस्पतीशास्त्राचे जागतिक संदर्भ असलेले उत्कृष्ट ‘बॉटनिकल गार्डन’ फुलविले आहे. मोजके अपवाद वगळले, तर जगभरातल्या कोणत्याही वनस्पती कोकणात तग धरू शकतात, असे त्यांचे निरीक्षण आहे. कोकणातल्या वनस्पती आणि फळांपासून किती तर्‍हेचे रोजगार उपलब्ध होऊ शकतात? वाया जाणार्‍या सर्व फळा-पिकांचा कोणता आणि कसा उपयोग होऊ शकतो ? नवे रोजगार कसे निर्माण होऊ शकतात? कोकणात कोणते कारखाने काढता येऊ शकतात? कोकणात उत्कृष्ट बॉटनिकल गार्डन हायवे कसा साकारता येतील? अशा विषयांवरील मुलभूत चिंतनाचा अनुकरणीय साठा असलेल्या या व्यक्तीमत्त्वाला ‘लोटिस्मा’ने पुरस्कार देऊन गौरवण्याचे निश्चित केले आहे.

‘अपरान्त संशोधन केंद्रा’च्या वतीने दिला जाणारा ‘अपरान्त भूषण’

‘लोटिस्मा’च्या वतीने भूतपूर्व अध्यक्ष स्वर्गीय अप्पासाहेब जाधव यांच्या नावाने वाचनालयाने चालू केलेल्या ‘अपरान्त संशोधन केंद्रा’च्या वतीने हा ‘अपरान्त भूषण’ पुरस्कार आपल्या कार्यकर्तृत्वाने कोकणाचा नावलौकिक वाढवणार्‍या व्यक्तींना देण्यात येतो. यापूर्वीचे पुरस्कार नामवंत इतिहास संशोधक आणि डेक्कन अभिमत विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. वसंत शिंदे, माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना प्रदान करण्यात आले आहेत. वाचनालयाच्या निवड समितीचे अध्यक्ष अरुण इंगवले, सदस्य चंद्रकांत राठोड, राष्ट्रपाल सावंत, अंजली बर्वे यांनी हा निर्णय घेतला आहे. वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक यांनी ‘लोटिस्मा’चा हा पुरस्कार एका कीर्तीवंत धन्वन्तरि व्यक्तीमत्त्वाला देण्यात येत असल्याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहोळा लवकरच  होणार असल्याचे वाचनालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.