आषाढ शुक्ल तृतीया (२१.६.२०२३) या दिवशी पाथरे बुद्रुक, नगर येथील कु. श्रीवर्धन पंकज घोलप याचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.
कु. श्रीवर्धन पंकज घोलप याला ८ व्या वाढदिसानिमित्त सनातन परिवाराकहून अनेक शुभाशीर्वाद !
‘वर्ष २०१६ मध्ये कु. श्रीवर्धन पंकज घोलप महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्येही त्याची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाली आहे.’ त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१६. ६. २०२३) |
१. सौ. स्वाती पंकज घोलप (श्रीवर्धनची आई)
१ अ. जिज्ञासू वृत्ती : ‘श्रीवर्धनला एखादा नवीन शब्द, वनस्पती, किडे, तसेच वस्तू यांविषयी पुष्कळ कुतूहल आणि जिज्ञासा असते. त्याविषयी अनेक प्रश्न विचारून तो माहिती जाणून घेतो.
१ आ. श्रीवर्धनचे पुष्कळ श्लोक आणि स्तोत्रे पाठ आहेत.
१ इ. विविध विषयांवरील गोष्टी ऐकायला आवडणे : श्रीवर्धनला श्रीकृष्ण, श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर पौराणिक अन् शौर्य कथा ऐकायला पुष्कळ आवडतात. तो गोष्टी ऐकतांना त्याविषयी पुष्कळ प्रश्नही विचारतो. मी ‘श्रीमानयोगी’ ही कादंबरी वाचत असतांना ‘त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहिले आहे’, असे मी त्याला सांगितल्यावर तो म्हणाला, ‘‘मला प्रतिदिन रात्री यातील एक पान वाचून दाखव. मलाही ऐकायचे आहे.’’
१ ई. स्वभाषेचा अभिमान असणे : मी घरी असतांना कधीकधी त्याच्याशी इंग्रजीत बोलते. तेव्हा तो मला म्हणतो, ‘‘आई, आपल्या भाषेत बोलत जा.’’ मी त्याला म्हणाले, ‘‘तुला इंग्रजी कळते ना ? मग काय हरकत आहे ?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘तू बोललेलेे मला समजते; पण मला आपली भाषा अधिक आवडते.’’
१ उ. देशाभिमान : एकदा मी आणि त्याच्या बाबांनी श्रीवर्धनला सैनिकांच्या जीवनाविषयी अन् त्यांच्या कार्याविषयी सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ‘मलाही सैनिकांसारखे लढून शत्रूचा नाश करायचा आहे.’
१ ऊ. एकाग्रतेने नामजप करणे : आमच्या घरासमोर असलेल्या औदुंबर वृक्षाच्या ओट्यावर बसून डोळे मिटून श्रीवर्धन ‘ॐ’चा जप करतो. कधी कधी तो ‘ॐ नमः शिवाय । किंवा श्री गुरुदेव दत्त ।’ हे जप करतो. एकदा तो दूरचित्रवाहिनीवरील देवाची मालिका पहात होता. त्यात त्याने एक भक्त भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करतांना पाहिला. थोड्या वेळाने तो बाहेर ओट्यावर जाऊन डोळे मिटून एकाग्रतेने भगवान शिवाचा नामजप करत होता. एकदा रामनवमीच्या दिवशी मी घरी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले. तेव्हा त्याने डोळे मिटून एकाग्रतेने रामनामाचा जप केला.
१ ए. देवाप्रती भाव : एकदा आम्ही बाहेर गेलो असतांना वाटेत गणपतीचे मंदिर दिसले; म्हणून आम्ही तेथे दर्शन घेण्यासाठी थांबलो. एरव्ही देवाला जातांना आम्ही घरातून फुले, पूजा साहित्य, नैवेद्य इत्यादी घेऊन जातो; पण त्या दिवशी आमच्या जवळ काहीच नव्हते. त्या वेळी श्रीवर्धनने त्याला खाण्यासाठी दिलेले शेंगदाणे गणपतीपुढेे ठेवले. तेव्हा तो म्हणाला, ‘‘आपण देवासाठी काहीच आणले नाही; म्हणून मी देवाला शेंगदाणे ठेवले.’’
१ ऐ. चूक स्वीकारून योग्य कृती करणे : श्रीवर्धनला त्याच्या चुकांची जाणीव करून दिल्यावर तो त्या स्वीकारतो आणि स्वतःच्या वागण्यात पालट करतो. पुढच्या वेळी तसा प्रसंग आल्यावर तो आधी समजावल्याप्रमाणे योग्य कृती करतो.’
१ ओ. स्वभावदोष : उतावळेपणा, अव्यवस्थितपणा, राग येणे, दूरचित्रवाहिनी आणि भ्रमणभाष यांवर ‘कार्टून’ पहाणे’
२. सौ. कल्याणी प्रवीण बंगाळ (फोंडा, गोवा) (श्रीवर्धनची मावशी)
२ अ. ‘श्रीवर्धन मोठ्यांचा आदर करतो आणि सगळ्यांशी नम्रतेने बोलतो.
२ आ. क्षात्रवृत्ती असणे : श्रीवर्धनने लहान असतांना शाळेत भगतसिंगांची वेशभूषा करून कणखर आवाजात ‘भारत माता की जय, वंदे मातरम् ।’ अशा घोषणा दिल्या होत्या. तसेच त्याने ‘मेरा रंगदे बसंती चोला’ या गीताच्या काही ओळीही क्षात्रवृत्तीने म्हटल्या होत्या.’
२ इ. श्रीवर्धनकडे पाहून पुष्कळ आनंद जाणवतो.’
३. कु. भावना कदम (नंदुरबार) (श्रीवर्धनची मावशी)
३ अ. रुग्णाईत असतांना बेशुद्ध अवस्थेतही हाताच्या बोटांची मुद्रा केलेली असणे : ‘श्रीवर्धन नंदुरबार येथे सुटीसाठी आला असतांना तो अकस्मात् रुग्णाईत झाला. त्याच्या डोक्यात ताप गेल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती. तेव्हा तो २ घंटे बेशुद्ध होता. त्या वेळीही त्याच्या हाताच्या बोटांची मुद्रा केलेली होती. तेव्हा ‘जणू त्याला देवच नामजप करायला सांगत आहे’, असे आम्हाला वाटले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक ३०.५.२०२२)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |