‘१६.६.२०२३ या दिवशी रामनाथ देवस्थान येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त वक्त्यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी देवाने आमच्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
१. अधिवक्ता अरुण कुमार गुप्ता, न्यायमित्र, अलाहाबाद उच्च न्यायालय, उत्तरप्रदेश
अ. त्यांनी ‘गंगानदीच्या गुणधर्मांचे वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व किती आहे ?’, ही संशोधनात्मक सूत्रे अतिशय सोप्या भाषेत आणि मनापासून मांडली. त्यामुळे त्यांचा विषय श्रोत्यांच्या मनावर खोलवर रुजला गेला.
आ. श्री. गुप्ता हे निष्काम कर्मयोगी आहेत, म्हणजे ते कोणतीही अपेक्षा न ठेवता निरपेक्षभावाने हिंदुत्वाचे कार्य करत असतात. त्यामुळे त्यांनी मांडलेला विषय ऐकून ‘धर्मप्रेमी हिंदु प्रभावीत होऊन ते गंगानदीच्या रक्षणाची कृती करण्यास सहजरित्या उद्युक्त होतात’, असे मला जाणवले.
२. श्री. विवेक शील अगरवाल, देहली
अ. त्यांच्यामध्ये सर्व हिंदूंप्रतीचा बंधूभाव पुष्कळ प्रमाणात असल्याचे जाणवले. त्यामुळे ते ‘व्यापक स्तरावर समाजातील सर्व हिंदु बांधवांच्या रक्षणासाठी नेमकेपणाने काय उपायोजना केली पाहिजे’, याचे चिंतन सतत करत असतात.
आ. त्यांच्या विचारांमध्ये सुस्पष्टता असल्यामुळे त्यांनी मांडलेला विषय श्रोत्यांना सहजरितीने समजतो आणि त्यांच्यातील तळमळीमुळे हिंदु क्रियाशील होतात.
३. डॉ. नील माधव दास, संस्थापक, ‘तरुण हिंदु’, झारखंड
अ. श्री. दास यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात अंतर्मुखता जाणवली. त्यामुळे ते मांडत असलेल्या विषयाचे गांभीर्य त्वरित श्रोत्यांच्या मनावर कोरले जाऊन तेही अंतर्मुख होऊन हा विषय ऐकत होते.
आ. ते बौद्धिक आणि वैचारिक या स्तरांवर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील प्रयत्न करण्याच्या संदर्भात अचूक मार्गदर्शन करत होते. त्यांच्या विचारांमध्ये हिंदुत्वाच्या रक्षणाचे विचार प्रामुख्याने असल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण अन् संघटनकौशल्य असल्यामुळे त्यांनी मांडलेला विषय ऐकून हिंदूूंध्ये संघभाव आणि ऐक्य निर्माण होते, तसेच ते लवकर संघटित होतात.’
४. श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
त्यांची बुद्धी आणि वाणी दोन्ही सात्त्विक असल्यामुळे ते बौद्धीक स्तरावरील विचार मांडत असतांनाही, त्या विषयाचे श्रोत्यांना सहजरित्या आकलन झाले.
५. श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
त्यांच्यावरील श्रीगणेशाच्या कृपेमुळे त्यांची बुद्धी मेधावी आहे. त्यामुळे ते बुद्धीवादी हिंदूंना ‘हिंदु राष्ट्र स्थापन करणे का आवश्यक आहे?’ याचे महत्त्व बुद्धीच्या स्तरावर चांगल्या प्रकारे पटवून देतात. त्यामुळे बुद्धीवादी धर्माभिमानी हिंदु धर्माच्या विरोधात होणार्या वैचारिक अपप्रचाराला सामोरे जाऊन तो अपप्रचार रोखण्यासाठी कटिबद्ध होतात.
– श्री. राम होनप, कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.६.२०२३)
|