‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका !

चित्रपटातून भगवान श्रीराम, सीतामाता, श्री हनुमान आदींचे चुकीचे चित्रण

नवी देहली – हिंदु सेना या हिंदुत्वनिष्ठ संघटनेकडून १६ जून या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ या रामायणावर आधारित चित्रपटाच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. हिंदु सेनेचे अध्यक्ष आणि याचिकाकर्ते विष्णु गुप्ता यांनी म्हटले आहे की, या चित्रपटात ‘रामायण’, भगवान श्रीराम आणि आपली संस्कृती यांची थट्टा करण्यात आली आहे. या चित्रपटातील भगवान श्रीराम, सीतामाता, श्री हनुमान आणि रावण यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह प्रसंग काढून टाकण्यात यावेत. या प्रसंगांतून रामायणातील चरित्रांचे चुकीचे चित्रण करण्यात आले आहे.

प्रेक्षकांकडून जोरदार टीका !

१६ जून या दिवशी ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच चित्रपट पहाणार्‍यांनी यावर जोरदार टीका केली. त्यांनी या चित्रपटातील प्रसंग, संवाद, पात्रांची वेशभूषा आदी मूळ रामायणाच्या विरुद्ध असल्याचे सांगत चित्रपटाला विरोध केला. सामाजिक माध्यमांवर या चित्रपटाच्या विरोधात मोहीमच उघडण्यात आली आहे. काही जणांनी चित्रपट निर्मात्यांवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.