पैठण (छत्रपती संभाजीनगर) – संत साहित्याचा अभ्यास करता यावा, यासाठी संतांची नगरी असलेल्या पैठणला संतपीठ स्थापन करण्यात आले. मागील वर्षीपासून अभ्यासक्रमही चालू झाला. येथे १५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. त्यांना शिकवण्यासाठी येथे १० प्राध्यापकांची नियुक्ती केली; परंतु एका पहाणीत संतपिठाच्या वर्गात एकही विद्यार्थी दिसला ना प्राध्यापक ! संतपीठाचे समन्वयक डॉ. प्रवीण वक्ते यांनी प्राध्यापक प्रतिदिन येत असल्याचा दावा केला; पण प्रत्यक्षात मात्र संतपिठातील बाके रिकामी होती, तर फळाही कोराच होता.
एकदा विषय थंड झाला की,त्याचे असे संतपीठ होते.करोडो रुपये खर्च करून फळ काय तर हे !
श्रीक्षेत्र पैठण येथील संतपीठ हे सध्या अभ्यासकांमध्ये चेष्टेचा विषय बनले आहे. असो
संबंधितानी उचित पावले उचलावीत ही विनंती.#Santpeeth #Paithan @Dev_Fadnavis @mieknathshinde #divyamarathi #news pic.twitter.com/Cc2VvhDqxR
— Yogiraj Gosavi, Paithankar (@yogirajgosavi) June 15, 2023
मागील ३८ वर्षांपासून पैठण येथील संतपीठ चालू होण्याची प्रतीक्षा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासह संत साहित्याचा अभ्यास करणारे अभ्यासक करत होते. मागील वर्षी याचा श्रीगणेशा झाला. अनेक विद्यार्थ्यांनी येथून पदव्या घेतल्या. आताही १५० विद्यार्थी येथे विविध धार्मिक-सामाजिक विषयांचे शिक्षण घेत आहेत. तेथे पहाणी केली असता तेथे ३ कर्मचारी आढळून आले. त्यांना याविषयी विचारले असता ‘प्राध्यापक येतात, आज आले नाहीत’, असे सांगितले; पण प्राध्यापक कधी येतात ? आणि विद्यार्थी, अभ्यासक कुठे शिकतात ? हा संशोधनाच विषय आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापक कधी येतात ? याची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारिक, विष्णु ढवळे आदी नागरिकांनी केली आहे.
उन्हाळा असल्याने काही जण सुटीवर !
संतपिठामध्ये प्राध्यापक प्रतिदिन उपस्थित असतात. आज माझी प्रकृती थोडी बिघडली असल्याने गावाकडे आलो आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने काही प्राध्यापक सुटीवर असतील; पण नेहमी प्राध्यापक उपस्थित असतात. – प्रा. डॉ. राधाकृष्ण अकोलकर, संतपीठ.
विदेशातील विद्यार्थी कसे येणार ?
पैठण येथील संतपीठात ‘ऑफलाईन’ आणि ‘ऑनलाईन’ दोन्ही अभ्यासक्रम चालू आहेत. विदेशातील विद्यार्थी येथे कसे येणार ? किती विद्यार्थी ऑनलाईन ? किती ऑफलाईन ? हे सांगता येणार नाही. १० प्राध्यापक प्रतिदिन येतात. – डॉ. प्रवीण वक्ते, समन्वयक, संतपीठ.
संपादकीय भूमिका :संतपिठात विद्यार्थी आणि शिक्षक यांची अनुपलब्धता, ही धर्मसाहित्याविषयीची समाजातील अनास्थाच दर्शवते ! |