विदेशी पाहुण्‍यांनी घेतला वारीचा आनंद !

वारीत सहभागी झालेले विदेशी पाहुणे

पुणे जी२० ‘डिजिटल अर्थव्‍यवस्‍था कार्यगट’ बैठकीसाठी पुण्‍यात दाखल झालेला आहे. या कार्यगटातील विदेशी पाहुणे पालखी सोहळ्‍याचा आनंद घेण्‍यासाठी सहभागी झाले होते. यामधून त्‍यांनी वारीचा आनंद घेत सांस्‍कृतिक परंपरा ‘याची देही याची डोळा’ अनुभवली, तसेच काहींनी श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रत्‍यक्ष दर्शन घेतले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्‍या उपस्‍थितीत संत तुकाराम महाराज पादुका मंदिराजवळ फर्ग्‍युसन महाविद्यालय प्रवेशद्वार येथे जी२० प्रतिनिधींसाठी पालखी सोहळा अनुभवता यावा, यासाठी प्रशासनाकडून मंडप उभारण्‍यात आला होता. पालकमंत्री चंदकांत पाटील यांनी विदेशी पाहुण्‍यांचे स्‍वागत केले. या वेळी पोलीस आयुक्‍त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्‍त विक्रम कुमार, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस सहआयुक्‍त संदीप कर्णिक, महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त विकास ढाकणे आदी उपस्‍थित होते. ढोल ताशांच्‍या गजरात आणि तुळशीमाळा, वारकरी उपरणे, टोपी घालून पाहुण्‍यांचे त्‍या वेळी स्‍वागतही करण्‍यात आले. या वेळी काही जणांनी वारकर्‍यांकडून कपाळाला टिळा लावून घेतला. ढोलताशांच्‍या तालावर काहींनी नृत्‍य केले, तर काहींनी मोठ्या उत्‍साहाने वारकर्‍यांसोबत फुगडीचा फेर धरला. यातील महिलांनी डोक्‍यावर तुळशीची रोपे घेतली. सर्वांनी भ्रमणभाषमध्‍ये वारीची छायाचित्रे काढली. उपस्‍थित विदेशी पाहुण्‍यांनी वारकर्‍यांना भारतीय पद्धतीने नमस्‍कार केला.