महिलांनो, स्वत:च्या सुरक्षिततेसाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा !
रत्नागिरी – १३ जून या दिवशी रिक्शाचालक अविनाश म्हात्रे याने त्याच्या रिक्शेतून प्रवास करणार्या एका महाविद्यालयीन तरुणीशी असभ्य आणि अश्लील वर्तन केले होते. याविषयी त्या तरुणीने सामाजिक माध्यमात प्रसारित केलेल्या एका ‘पोस्ट’मुळे शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनीच पुढाकार घेत त्या तरुणीशी संपर्क साधून संशयित आरोपी अविनाश म्हात्रेला कह्यात घेतले. या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी महिलांना आवाहन केले आहे.
या आवाहनात म्हटले आहे की,
१. आपण कोणत्याही वाहनाने एकट्याने प्रवास करत असल्यास त्या वाहनाचा नंबर स्वत:च्या भ्रमणभाषद्वारे टीपून स्वत:चे पालक आणि नातेवाईक यांना पाठवावा.
२. प्रवासादरम्यान आपल्याला एखाद्या इसमाच्या संशयित अथवा विकृत हालचाली दिसून येताच लागलीच ११२, अथवा हेल्पलाईन नंबर १०६१ किंवा पोलीस नियंत्रण कक्ष (०२३५२) २२२२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
३. मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता लागलीच आपण स्वत:च्या नातेवाइकांकडे अथवा पोलिसांकडे साहाय्य मागावे.
४. पोलीस दलाच्या अधिकृत ‘ट्विटर हँडल’, ‘फेसबुक’ अथवा ‘इंस्टाग्राम’वरही अशी घटना लागलीच ‘टॅग’ करू शकता.