औरंगजेबाच्‍या मजारच्‍या संरक्षित स्‍मारकाचा दर्जा काढण्‍याचे धैर्य दाखवा ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सोबत औरंगजेबाची मजार

छत्रपती संभाजीनगर – गेल्‍या काही दिवसांत वेगवेगळ्‍या ठिकाणी कार्यक्रमात औरंगजेबाचे छायाचित्र झळकल्‍याने वाद झाल्‍याचे समोर आले आहेत, तर कोल्‍हापूरमध्‍ये औरंगजेबाचे छायाचित्र स्‍टेटस ठेवण्‍यावरून हिंसाचार झाल्‍याचे समोर आले आहे. यावरूनच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे भाजपवर टीका करतांना म्‍हणाले की, औरंगजेबचा भाजपला एवढाच तिटकारा असेल, तर त्‍यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबच्‍या मजारला (कबरीला) असलेला संरक्षित स्‍मारकाचा दर्जा काढवून दाखवावा, असे पत्र दिल्लीश्‍वर दैवताला लिहिण्‍याची हिम्‍मत दाखवा, असे आव्‍हान १० जून या दिवशी ट्‍विटरवरून केले आहे.

अंबादास दानवे म्‍हणाले की, मोगल बादशाह औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे छायाचित्र झळकावणे आणि ‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप स्‍टेटस’ ठेवण्‍यावरून राजकारण चालू असतांना  औरंगजेबाचे भूत सत्ताधारीच बाहेर काढत आहेत. यात अल्‍पवयीन मुले सापडत आहेत. ते स्‍वतःचा मेंदू वापरून हे कृत्‍य करणे शक्‍य वाटत नाही. त्‍यांचा ‘ब्रेनवॉश’ करणारी यंत्रणा कोण आहे ? हे पहाणे आवश्‍यक आहे.

संपादकीय भूमिका : 

  • औरंगजेबाच्‍या विषयावरून राजकारण करण्‍यापेक्षा औरंगजेबाच्‍या ज्‍या चुकीच्‍या गोष्‍टी आहेत, त्‍या समाजातून हटवल्‍या पाहिजेत.
  • महाविकास आघाडीची सत्ता असतांना खुलताबाद येथील औरंगजेबाच्‍या मजारीला (कबरीला) असलेला संरक्षित स्‍मारकाचा दर्जा का काढला नाही ? त्‍या वेळी महाविकास आघाडी सरकारला कुणी रोखले होते ? स्‍वतःची सत्ता असतांना काही करायचे नाही आणि दुसर्‍या पक्षाची सत्ता आल्‍यानंतर अशी अपेक्षा करणे हे अयोग्‍य आहे, हे अंबादास दानवे यांच्‍या लक्षात कसे येत नाही ?