तमिळनाडूचे उर्जामंत्री सेंथिल बालाजी यांना अटक केल्यावर त्यांच्या छातीत दुखू लागले !

काळा पैसा बाळगल्याचे प्रकरण

चेन्नई – काळा पैसा पांढरा केल्याच्या प्रकरणात तमिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर बालाजी यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे त्यांना ओमंडुरार येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. या अटकेचा सत्ताधारी द्रमुक पक्षाने निषेध केला आहे.

१. सेंथिल बालाजी यांचे चेन्नई येथील निवासस्थान, तसेच त्यांच्या करूर येथील वडिलोपार्जित निवासस्थानावरही धाड टाकण्यात आली.

२. ‘बालाजी यांची अटक ही घटनाबाह्य असून त्याविरोधात कायदेशील लढाई देऊ. आमचा पक्ष केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या धमकीच्या राजकारणाला घाबरत नाही’, असे द्रमुकने म्हटले आहे.

३. सर्वोच्च न्यायालयाने मागील मासात बालाजी यांच्या विरोधात काळा पैसा बाळगल्याच्या प्रकरणात पोलीस आणि अंमलबजावणी संचालनालय यांना अन्वेषण करण्याची अनुमती दिली होती.

४. हे प्रकरण वर्ष २०१४ मधील आहे. त्या काळी बालाजी हे अण्णाद्रमुक सरकारमध्ये परिवहनमंत्री होते.

संपादकीय भूमिका

कारागृहात जाण्यापासून वाचण्यासाठी अटक करण्यात आलेल्या राजकारण्यांना हमखास होणारा आजार ! अशांवर कारवाई होणे आवश्यक !