आळंदी (जिल्हा पुणे) – आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ११ जून या दिवशी सायंकाळी ४ ते ६ च्या दरम्यान आळंदीतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यांतून छोट्या-मोठ्या दिंड्या अलंकापुरीत आल्या आहेत. हरिनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन आणि हरिपाठाच्या निनादाने अवघी अलंकापुरी भक्तिरसात चिंब झाली आहे.
( सौजन्य : tv9 मराठी )
गेल्या २ दिवसांपासून आळंदीत वारकर्यांची लगबग दिसू लागली आहे. खास करून इंद्रायणी काठी, सिद्धबेट, गोपाळपुरा या भागात वारकर्यांची विशेष गर्दी आहे. काही छोट्या-मोठ्या दिंड्या पायी आळंदीत पोचू लागल्या आहेत. यामध्ये मराठवाडा, विदर्भ, खानदेश, नाशिक आदी भागांतील वारकरी सध्या मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. ठिकठिकाणी वारकर्यांच्या टाळांचा निनाद कानी येत आहे. देऊळवाड्यात पहाटेपासूनच माऊलींच्या समाधी दर्शनासाठी गर्दी झाली. इंद्रायणीकाठी वासुदेवांची गर्दी आहे. पालखीला खांदा देणार्या सव्वाशे आळंदीकर खांदेकर्यांनाच मंदिरात ‘फोटोपास’ आणि आधारकार्ड पाहून प्रवेश दिला जाईल.
असा असेल पालखीचा मुक्काम !
सोहळ्यात श्रींचा पालखी सोहळा पुण्यनगरीत २ दिवस पाहुणचार घेत १४ जूनला सासवड मुक्कामास दिवे घाटातून हरिनाम गजरात मार्गस्थ होणार आहे. १४ आणि १५ जूनला सासवड येथे मुक्काम करेल. १६ जूनला जेजुरीकडे प्रस्थान, १७ जूनला जेजुरीला मुक्कामी असेल. १८ जूनला लोणंद येथे सोहळा विसावेल. १९ जूनला अधिक एक दिवसाचा मुक्काम आणि २० जूनला तरडगाव, २१ जूनला फलटणकडे प्रस्थान करेल. २२ जूनला पालखीचा फलटणमध्ये मुक्काम असेल. २३ जूनला नातेपुते, २४ जूनला माळशिरस येथे मुक्काम, २५ जूनला वेळापूर, २६ जूनला भंडी शेगाव, २७ जूनला वाखरी, २८ जूनला पंढरपूर आणि २९ जूनला आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल.