संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान !

पिंपरी (जिल्हा पुणे)- आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १० जूनला दुपारी २ वाजता प्रस्थान झालेे. देहूकरांनी वारकर्‍यांचे स्वागत केले. पालखीचा देहूबाहेरील पहिला मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात असणार आहे. या ठिकाणीही पालिकेच्या वतीने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ११ जून या दिवशी आळंदी येथून होईल. वारकरी देहू आणि आळंदीत आले आहेत, तर यापूर्वीच काही दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत.

पालखी प्रस्थाननिमित्त देहूतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परंपरेप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेे. मंदिराची रंगरंगोटी, विविधरंगी पुष्प सजावट, आकर्षक विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे. आकुर्डी येथे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पालिकेने नियंत्रण कक्ष उभारला आहे. दिंड्यांच्या मुक्कामासाठी शाळा उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी स्वतंत्र समन्वयक नियुक्त केले आहेत. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये, स्नानगृहांची व्यवस्था केली आहे. वैद्यकीय सुविधा, औषधे यांच्यासह मार्गावर फिरती रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.