पुणे येथे वारी सोहळ्‍यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्‍त !

पुणे – देहू येथून १० जून या दिवशी जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज आणि ११ जून या दिवशी आळंदी येथून संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्‍या पालखीचे प्रस्‍थान होणार आहे. दोन्‍ही पालख्‍यांचे ११ जूनला पुण्‍यात आगमन होणार असून १२ आणि १३ जून या दिवशी पालख्‍या पुण्‍यात मुक्‍कामी असणार आहेत.

१. संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद़्‍गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्‍यासाठी अनुमाने ७ सहस्र पोलिसांचा बंदोबस्‍त तैनात करण्‍यात येणार आहे.

२. ठिकठिकाणी ‘सीसीटीव्‍ही कॅमेरे’, तसेच ‘ड्रोन’द्वारे पालखीवर लक्ष रहाणार असून दिंड्या आणि पोलिसांच्‍या समन्‍वयासाठी १० दिंड्यांसह ‘वॉकीटॉकी’ घेतलेला कर्मचारी तैनात असणार आहे.

३. विक्रमी गर्दी विचारात घेता पालखी आगमनापासून ते प्रस्‍थानापर्यंत पोलिसांनी बंदोबस्‍ताचे कडेकोट नियोजन केले आहे. यासाठी वाहतूक पोलिसांचाही स्‍वतंत्र बंदोबस्‍त असणार असून नागरिकांना अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.

४. पालखी सोहळ्‍यात होणार्‍या चोरीच्‍या घटनांना आळा घालण्‍यासाठी गुन्‍हे शाखेकडून साध्‍या वेशात २५० कर्मचारी तैनात करण्‍यात येणार आहेत. त्‍यांची विशेष पथके सिद्ध करण्‍यात आली आहेत.