राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी !

गृहविभागाने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी ! – राष्ट्रवादी काँग्रेसची पोलीस आयुक्तांकडे तक्रारद्वारे मागणी  

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सामाजिक माध्यमातील ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या ट्विटर हँडलवरून ‘तुमचा लवकरच दाभोलकर होणार’, अशी पोस्ट टाकून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. या धमकीसमवेतच शरद पवार यांना अश्‍लाघ्य भाषेत शिवीगाळही करण्यात आली आहे.  ‘या संदर्भात गृहविभागाने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी. शरद पवार यांना काही झाल्यास त्या सगळ्याला राज्य सरकार अणि केंद्र सरकार उत्तरदायी असणार आहे’, असे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडणार्‍या तणावग्रस्त घटनांच्या संदर्भात शरद पवारही विविध भाष्य करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ही धमकी मिळाली आहे. पवार यांना धमकी आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत, तसेच घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शरद पवार यांना ज्या ट्विटर हॅण्डलवरून धमकी आली, त्याची शहानिशा करून कारवाई करा, असा आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिला आहे. त्यांनी गृहमंत्र्यांची घरी जाऊन भेट घेतली.

कोणत्याही नेत्याला धमकी देणे खपवून घेतले जाणार नाही ! – फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शरद पवार यांना आलेल्या धमकी प्रकरणावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात एक उच्च परंपरा आहे. राजकीय पातळीवर मतभेद असले, तरी मनभेद नाहीत.

कोणत्याही नेत्याला धमक्या देणे किंवा समाज माध्यमांवर व्यक्त होतांना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणे हे खपवून घेणार नाही.

मुख्य सूत्रधाराचा शोध घ्या ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

विरोधी पक्षनेते अजित पवार

शरद पवार यांना धमकी देणारा सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. त्याला भाजपचा पाठिंबा आहे का ? त्यांच्यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे ?, याचे अन्वेषण व्हायला हवे.

विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. ‘छत्रपती संभाजीनगरला ‘औरंगाबाद’च म्हणणार असे शरद पवार म्हणाले आहेत’, अशी चुकीची बातमी एका माध्यमाने दिली होती.