स्वामी विवेकानंद यांची प्रतिभा आणि प्रभुत्व

आज तिथीनुसार स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

स्वामी विवेकानंद यांना कोलकोताच्या वेदज्ञ पंडितांनी संस्कृतमध्ये प्रश्न विचारले. त्या वेळी स्वामीजींचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व आणि आचरण यांविषयी प्रसंग येथे देत आहोत.

स्वामी विवेकानंद

१. श्री सरस्वतीदेवी जणू स्वामीजींच्या कंठी विराजमान झाल्याप्रमाणे त्यांच्या वाणीमुळे अनेक लोक मंत्रमुग्ध होणे

‘विलायतेहून परत आल्यानंतर स्वामीजींची कीर्ती त्या वेळी भारतात प्रांतोप्रांती पसरली होती. त्या वेळी काही लोक कुतूहलाने, काही तत्त्वचर्चा करण्याच्या हेतूने, तर काही स्वामीजींच्या ज्ञानाची परीक्षा पहाण्याच्या बुद्धीने तेथे येत. प्रश्नकर्ते स्वामीजींच्या तोंडून शास्त्रविवरण ऐकून मुग्ध झाल्याचे, त्यांची सर्वगामी प्रतिभा पाहून मोठमोठे तत्त्वज्ञानी आणि विश्वविद्यालयाचे नामांकित प्राध्यापक गप्प होऊन गेल्याचे शिष्यांनी पाहिले आहे. श्री सरस्वतीदेवी जणू नेहमी स्वामीजींच्या कंठी विराजमान असे.

२. वेदज्ञ पंडितांनी विचारलेल्या सर्व गूढ प्रश्नांची स्वामी विवेकानंद यांनी शांत अन् गंभीरपणे संस्कृतमध्ये उत्तरे देणे

कोलकाताच्या बडाबाजार भागात अनेक पंडित रहात असत. श्रीमंत मारवाडी लोक त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करत. या वेदज्ञ आणि दार्शनिक पंडितांच्या कानी स्वामीजींची कीर्ती गेली होती. त्यांच्यापैकी काही जण वाद करण्याच्या बुद्धीने एक दिवस स्वामीजींकडे आले. त्या वेळी स्वामीजींचे शिष्य तेथे उपस्थित होते. आलेले सारे पंडित अस्खलितपणे संस्कृत बोलू शकत होते. भेटीला आलेल्या लोकांच्या गराड्यात बसलेल्या स्वामीजींना नमस्कार करून पंडितांनी त्यांच्याशी संस्कृतात बोलायला आरंभ केला. स्वामीजीही त्यांना संस्कृतमध्ये उत्तरे देऊ लागले.

वाद कोणत्या विषयावर चालला होता, हे शिष्याला आता स्मरत नाही; पण सारे पंडित एकदमच गोंगाट करून तत्त्वज्ञानातील गूढ प्रश्न स्वामीजींना संस्कृतमध्ये विचारत होते आणि स्वामीजीही शांत अन् गंभीरपणे हळूहळू आपले तर्कसंगत सिद्धांत त्यांना पटवून देत होते. एवढे मात्र त्याच्या चांगले स्मरणात आहे.

२ अ. पंडितांनी स्वामीजींचे भाषेवरील प्रभुत्व मान्य करणे आणि त्यांच्यात अद्भुत शक्तीचे स्फुरण होत असल्याची सर्वांना प्रचीती येणे : पंडितांच्या भाषेपेक्षा स्वामीजींची भाषा ऐकायला गोड आणि अधिक सुललित होती, हेही त्या शिष्याला नक्की आठवते. पुढे त्या पंडितांनीही ही गोष्ट मान्य केली. स्वामीजींचे त्या दिवशीचे संस्कृतमधील अस्खलित वक्तृत्व ऐकून त्यांचे गुरुबंधूही आश्चर्यचकित झाले. गेली ५-६ वर्षे युरोप आणि अमेरिका येथे घालवल्याने स्वामीजींचा संस्कृतशी विशेष संबंध नाही, ही गोष्ट सगळ्यांना ज्ञात होती. शास्त्रज्ञ आणि पंडितांसह स्वामीजींचे त्या दिवशीचे बोलणे ऐकून त्या प्रसंगी स्वामीजींमध्ये अद्भुत शक्तीचे स्फुरण होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या दिवशीच्या त्या बैठकीत स्वामी रामकृष्णानंद, योगानंद, निर्मलानंद, तुरीयानंद आणि शिवानंद इत्यादी मंडळी उपस्थित होती.

२ आ. स्वामीजींच्या विनयाने पंडित मुग्ध होणे आणि शेवटी त्यांनी स्वामीजींचे श्रेष्ठत्व अन् त्यांच्यातील अलौकिक प्रतिभा मान्य करणे : त्या दिवशीच्या त्या वादात आलेल्या पंडितांनी पूर्वपक्ष आणि स्वामीजींनी सिद्धांतपक्ष मांडला. बोलण्याच्या भरात स्वामीजींच्या तोंडून चुकून ‘अस्ति’च्या जागी ‘स्वस्ति’ असा शब्दप्रयोग झाल्याने सारे पंडित हसले. ही गोष्ट शिष्याला चांगली आठवते; पण स्वामीजी लागलीच म्हणाले, ‘पण्डितानां दासोऽहं क्षन्तव्यम् एतत् स्खलनम् ।’ म्हणजे ‘मी पंडितांचा दास आहे, या चुकीसाठी मला क्षमा करावी.’ स्वामीजींच्या या विनयाने पंडितही मुग्ध झाले.

बराच वेळ वाद घातल्यानंतर स्वामीजींच्या सिद्धांतपक्षाचे म्हणणे मान्य करून ते लोक जाण्यास निघाले. उपस्थित असलेल्या लोकांतील २-४ जण त्या पंडितांसमवेत बाहेर पडले आणि ‘स्वामीजींविषयी काय वाटते ?’, असा प्रश्न त्यांनी त्यांना विचारला. यावर त्यांच्यातील एक वयोवृद्ध पंडित म्हणाला, ‘‘ते व्याकरणात जाणकार नसले, तरी शास्त्राचे गूढ मर्म त्यांना अवगत झाले आहे. आपल्या मताचे विवरण करण्यात तर ते अद्वितीय आहेत. प्रतिपक्षाची सूत्रे खोडून काढण्यात त्यांनी अलौकिक प्रतिभा आणि असामान्य पांडित्य दाखवले.’’

२ इ. स्वामीजी आणि पंडित यांच्यातील विवादात ‘स्वामीजींना जय मिळावा’, यासाठी गुरुबंधूंनी नामजपासह गुरुचरणी व्याकूळ होऊन विनवणी करणे : स्वामीजींवर त्यांच्या गुरुबंधूंचे अलौकिक प्रेम दिसून येत असे. स्वामीजी पंडितांशी वाद करण्यात गुंतले असता दिवाणखान्याला लागून असलेल्या उत्तरेकडील खोलीत स्वामी रामकृष्णानंद जप करत बसल्याचे शिष्याला आढळून आले. पंडित लोक निघून गेल्यानंतर त्या जपाचे कारण त्यांना विचारले असता, ‘स्वामीजींना वादात जय मिळावा, एवढ्यासाठी श्रीरामकृष्णांच्या चरणी व्याकूळ होऊन विनवणी करत होतो’, असे त्यांनी सांगितले. पंडित लोक निघून गेल्यावर स्वामींजींकडून शिष्याला कळले की, पूर्वपक्ष करणारे ते पंडित पूर्वमीमांसाशास्त्रांत चांगलेच पारंगत होते. स्वामीजींनी उत्तरमीमांसापक्षाचा अवलंब करून त्यांच्यापुढे ज्ञानकांडाची श्रेष्ठता प्रतिपादन केली आणि पंडितांना स्वामीजींचे सिद्धांत मान्य करणे भागच पडले.

२ इ. ‘ऐहिक सुखसमृद्धी’ हा राष्ट्राच्या सभ्यतेचा मापदंड नसून ‘राष्ट्र आध्यात्मिक दृष्टीने प्रगत होण्याला सभ्यता’, असे म्हटले जाणे : ‘सभ्यता कशाला म्हणतात ?’, या प्रश्नाला उत्तर देतांना स्वामीजी म्हणाले, ‘‘एखादा समाज वा एखादे राष्ट्र आध्यात्मिकतेत जेवढे प्रगत तेवढा तो समाज आणि ते राष्ट्र सभ्य होय.’’ नाना प्रकारची यंत्रे किंवा कारखाने यांची वाढ करून ऐहिक सुखसमृद्धी प्राप्त करून घेतली; म्हणून एखादे राष्ट्र सभ्य झाले, असे म्हणता येणार नाही. सध्याच्या पाश्चात्त्य सभ्यतेमुळे आवश्यकता आणि हाहाःकार यांचीच दिवसेंदिवस वाढ झालेली दिसते; परंतु प्राचीन भारतीय सभ्यता सर्वसाधारण लोकांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवून लोकांतील ऐहिक आवश्यकता समूळ नष्ट जरी नाही, तरी बर्‍याच प्रमाणात न्यून करू शकली होती, ही गोष्ट निःसंदेह !

२ उ. अध्यात्माविषयीच्या संकुचित कल्पना असलेल्या पाश्चात्त्यांच्या चौकटीत स्वामी विवेकानंदांचे आनंदी आणि मुक्त वागणे न बसणे : पाश्चात्त्यांची कल्पना अशी असते की, माणूस जितका धर्मपरायण होईल, तितकी त्याची वागणूक गंभीर व्हावयास हवी. त्याने तोंडावाटे अन्य कोणती गोष्टही काढणे अयोग्य. त्यांच्यातील धर्मगुरु माझ्या तोंडून उदार धर्ममते ऐकून एकीकडे जितके आश्चर्यचकित होत, तितकेच व्याख्यान संपल्यावर मी केलेला मित्रांसमवेतचा विनोद ऐकून त्यांना विस्मय वाटे. पुष्कळदा तर ते मला अगदी तोंडावर म्हणत, ‘स्वामीजी, आपण धर्मगुरु आहात. सामान्य लोकांप्रमाणे हसणे-खिदळणे आपल्याला शोभत नाही. असला अवखळपणा आपल्याला उचित नव्हे.’ मीही त्यांना सांगत असे, ‘‘आम्ही म्हणजे आनंदाचे वारसदार ! आम्ही काय म्हणून आंबटसुतकी तोंडवळा करून बसावे ?’’

– श्री शरदचंद्र चक्रवर्ती (ग्रंथ : ‘स्वामी विवेकानंदांच्या सहवासात’)

(साभार : मासिक ‘श्रीगजानन आशिष’, मे २०११)