सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव ११ मे या दिवशी साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले काष्ठापासून बनवलेल्या सुवर्ण रंगाच्या दिव्य रथात विराजमान झाले होते. ‘या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि त्याची वैशिष्ट्ये, तसेच साधकांना सेवा करतांना आलेल्या अडचणी, त्या अडचणींवर गुरुकृपेने केलेली मात अन् त्यांना आलेल्या बुद्धीअगम्य अनुभूती’ पुढे दिल्या आहेत. ८ जून या दिवशी आपण रथनिर्मितीच्या कार्यातील विविध टप्पे पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
(भाग ४ )
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/690078.html
‘रथावर जितकी अल्प नक्षी घेऊ शकतो, तितकी अल्प नक्षी घ्यावी’, असे प.पू. गुरुदेवांनी सांगणे‘देवस्थानात असणार्या रथावर इतकी नक्षी असते की, तेथे मोकळी जागा दिसत नाही. त्यामुळे त्याची स्पंदने अगदी वेगळी वाटतात. त्या नक्षीचा विषय धार्मिक (उदा. देवतांची वाहने, म्हणजे हत्ती, सिंह किंवा विविध आकारांची फुले) असला, तरीही ती नक्षी तितकी सात्त्विक वाटत नाही. प.पू. गुरुदेवांनी सांगितले, ‘‘रथावर जितकी अल्प नक्षी घेऊ शकतो, तितकी अल्प नक्षी घ्यावी.’’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१६.५.२०२३) (‘महर्षींनीही असेच सांगितले होते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि महर्षि यांच्या संदेशात एकरूपता आहे’, असे लक्षात येते.’ – संकलक) |
६. श्रीविष्णुतत्त्व आकर्षित करणार्या रथाचा आराखडा कसा सिद्ध करण्यात आला ?
६ अ. रथाच्या चित्राचा प्रारंभ करतांना ‘हा रथ श्रीविष्णूसाठीच आहे’, असा भाव ठेवून प्रयत्न करणे आणि प्रायोगिक सूत्रे लक्षात घेऊन मिळणार्या रथाच्या आकारात विष्णुतत्त्व येण्यासाठी प्रयत्न करणे : रथाच्या चित्राचा प्रारंभ करतांना ‘हा रथ श्रीविष्णूसाठीच आहे’, असा भाव ठेवून मी प्रयत्न चालू केले; परंतु मागच्या वर्षी ‘रथ मार्गावरून फिरवतांना येणार्या अडचणी, उंचीच्या मर्यादा, संताची सोय, रथ ओढणार्या आणि हाताळणार्या साधकांची सोय, योग्य चित्रीकरण होण्यासाठीची सूत्रे’ इत्यादी अनेक घटक या रथाच्या चित्रात लक्षात घेणे आवश्यक होते. त्यामुळे ‘रथाचा आराखडा बनवतांना प्रायोगिक सूत्रे लक्षात घेऊन मिळणार्या आकारात विष्णुतत्त्व कसे येईल ?’, यासाठी प्रयत्न केले.
६ आ. ‘हा रथ अधिकाधिक सात्त्विक असावा’, असा विचार करून रथाचे चित्र काढणे, त्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले पालट करणे आणि ‘चित्रात ७० टक्के विष्णुतत्त्व आले’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे : प्रत्यक्ष श्रीविष्णूचा रथ हा निराळा असेल; पण ‘अनेक मर्यादा लक्षात घेऊन निर्माण होणारा हा रथ अधिकाधिक सात्त्विक असावा’, असा विचार करून मी चित्र काढायला घेतले. अशा प्रकारे रथाच्या संदर्भात प्रायोगिक सूत्रे लक्षात घेऊन आणि त्याचा सूक्ष्मातून प्रयोग करून निर्माण झालेले रथाचे चित्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पडताळले. त्या वेळी त्यांनी त्याची लांबी आणि रुंदी यांमध्ये काही पालट सांगितले. तसे पालट केल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले, ‘‘त्यात ७० टक्के श्रीविष्णुतत्त्व आले आहे.’’
‘कलियुगात कलाकृतीत ७० टक्के विष्णुतत्त्व येणे’, ही पुष्कळ मोठी गोष्ट आहे.’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ |
६ इ. श्री विष्णुतत्त्वाच्या आकाराच्या रथात पू. कवटेकरगुरुजी यांनी सांगितलेली सर्व प्रायोगिक सूत्रे लक्षात घेऊन पालट करणे : रथाचे हे चित्र आम्ही पू. कवटेकरगुरुजींना दाखवले. पू. कवटेकरगुरुजी यांनी सांगितलेल्या सुधारणा अगदी प्रायोगिक तत्त्वावर होत्या. रथशास्त्राचा त्यांचा सखोल अभ्यास होता. ‘निव्वळ चित्राकडे पाहूनच ते प्रत्यक्ष रथ बांधणी झाल्यावर काय अडचणी येऊ शकतील ?’, हे सांगत असत.
श्रीविष्णुतत्त्वाच्या आकाराच्या रथात पू. कवटेकरगुरुजी यांनी सांगितलेली सूत्रे लक्षात घेऊन पालट केले. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला ही दोन्ही चित्रे पू. गुरुजींना पहाण्यासाठी ठेवायला सांगितली. गुरुजींनी ‘तो शहरातील अरुंद रस्त्यावरून जाणार असल्याने त्याची रुंदी किती असावी ? त्या रुंदीला अनुसरून लांबी किती असल्यास चांगले दिसेल ? लांबी आणि रुंदी यांच्या तुलनेत उंची किती असावी ? रथ वळणावर सहज आणि सुरक्षित वळेल अन् साधकांना सहज ओढता येईल’, असा आकार सांगितला. त्यांच्या अनुभवावरून सिद्ध झालेल्या रथाचे अनेक बारकावे त्यांनी आम्हाला शिकवले.
६ ई. पू. कवटेकरगुरुजींकडून रथाविषयीचा प्रायोगिक भाग शिकतांना त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा भाव लक्षात येणे : पू. कवटेकरगुरुजी संत असल्यामुळे त्यांनी सांगितलेल्या आकारात सात्त्विकता होतीच; पण ‘त्यात श्रीविष्णुतत्त्व कसे आणायचे ?’, याचे प्रयोग करून चित्र पूर्ण केले. गुरुजींकडून प्रायोगिक भाग शिकतांना मला त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा भावही शिकायला मिळाला. पू. गुरुजींनी सांगितले, ‘‘गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) रथात बसल्यावर त्यांचे चरण आपल्या डोळ्यांच्या समोरच (स्तरावर) यायला हवेत. प्रत्येक भक्ताला गुरूंचे चरण दिसायला हवेत.’’ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रथात चढणे आणि बसणे’, याविषयी पू. कवटेकरगुरुजींनी सांगितलेली सूत्रे ऐकून त्यांचा गुरुदेवांप्रतीचा भाव स्पष्ट होत असे. रथाचे शास्त्र शिकवतांना ते बर्याचदा आम्हाला सांगत, ‘‘तुम्ही हे प.पू. गुरुदेवांना विचारून घ्या. ते म्हणतील तसेच आपण करूया.’’ त्यांना इतके ज्ञान असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित तत्त्व रथात येण्यासाठी रथाच्या चित्रात पालट केल्यास ते स्वीकारत असत.
६ उ. रथाचा मूळ आकार अंतिम झाल्यावर रथाच्या प्रत्येक आकारात श्रीविष्णुतत्त्व आणण्यासाठी परात्पर गुरुदेवांनी साधिकेकडून प्रयोग करून घेणे : पू. कवटेकरगुरुजी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रथाचा मूळ आकार अंतिम केला. त्यानंतर रथाच्या एकेका भागाचा आकार सूक्ष्मातून पाहून त्यात श्रीविष्णुतत्त्व आणण्यासाठी गुरुदेवांनी माझ्याकडून प्रयोग करून घेतले. रथाचा प्रत्येक आकार सूक्ष्म स्तरावर अभ्यास करून बनवला आहे. ‘प्रथम रथाच्या मजबुतीसाठी प्रायोगिक सूत्रे लक्षात घेऊन नंतर त्या आकारात श्रीविष्णुतत्त्व कसे आणू शकतो ?’, यासाठी प्रयत्न केले.
६ ऊ. घुमटांचे आकार, तसेच रथावरील कमानी आणि खांब यांचे आकारही प.पू. गुरुदेवांनी आमच्याकडून अंतिम करून घेतले.
६ ए. ‘रथाच्या बाजूचे लहान खांब (Barrigates) बनवतांना त्यांची संख्या किती असावी ?’, हेही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील प्रयोग करून ठरवले आहे.’
७. रथावरील नक्षीची निवड
अ. ‘आम्ही सनातनच्या ‘सात्त्विक रांगोळ्या’ आणि ‘मेंदीच्या सात्त्विक कलाकृतींचे प्रकार’ या ग्रंथांमधील नक्षी प्राधान्याने घेतल्या.
आ. आम्ही रथावरील नक्षी बनवतांना श्रीविष्णुतत्त्वानुसार भाव, चैतन्य आणि आनंद यांची स्पंदने प्रक्षेपित करणारे आकार निवडले. त्या वेळी प.पू. गुरुदेवांनी केवळ २ किंवा ३ आकार घेऊन सुटसुटीत नक्षी बनवायला सांगितली.
इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘निरनिराळ्या नक्षी एकत्र केल्यावर अपेक्षित अशी स्पंदने आली आहेत का ?’, हे पहाण्यासाठी आमच्याकडून प्रयोग करून घेतले. त्या वेळी आम्ही ‘नक्षीचा प्रकार, तिचा आकार आणि आकारमान, तसेच नक्षींमधील अंतर’ इत्यादी प्रयोग केले.
ई. रथावर नक्षी नसतांना आणि नक्षी लावल्यावरही त्याची स्पंदने निर्गुणच राहिली असल्याचे आम्हाला जाणवले. प्रत्यक्षात ती निर्गुण-सगुण व्हायला हवी होती. यातून ‘रथाची नक्षीही निर्गुण तत्त्वाची झाली आहे’, हे आमच्या लक्षात आले.
उ. चित्रातील रथावर नक्षी केल्यावर रथातून आनंदाचीही स्पंदने जाणवू लागली होती.
ऊ. नक्षीकडे पाहून सात्त्विकता आणि प्रसन्नता जाणवत होती.
ए. आम्ही अनेक देवस्थानांचे रथ पाहिले होते. ‘लाकडावर जेवढे बारीक आणि क्लिष्ट कोरीव काम असेल, तेवढा तो रथ अधिक सुंदर’, असा समज आहे; पण भगवंताच्या या रथावरची नक्षी सुटसुटीत आणि मोहक झाली होती. तिच्याकडे पाहिल्यावर साधकांना आध्यात्मिक स्तरावरील अनुभूती येत होत्या.
८. रथाचा रंग
प.पू. गुरुदेवांनी सांगितले, ‘‘श्रीविष्णु रथात बसणार असल्याने रथ चैतन्यमय असायला हवा. रथाला सोनेरी रंग देऊया.’’
– सौ. जान्हवी रमेश शिंदे, फोंडा, गोवा. (१६.५.२०२३)
(क्रमशः)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या / साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/690657.html