‘ऑनलाईन’ खेळाच्या नावाखाली हिंदु मुलांचे धर्मांतर करण्याचे पाकिस्तानचे षड्यंत्र !

पाकचा ‘खेळ जिहाद’ !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून किशोरवयीन हिंदु मुलांचे धर्मांतर केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. हिंदु मुलांचे धर्मांतर करण्यासाठी धर्मांधांची टोळी सक्रीय आहे. या टोळीचा म्होरक्या शाहनवाज मकसूद उर्फ बद्दो याच्या संपर्कात १०० हून अधिक किशोरवयीन हिंदु मुले आली आहेत.

१. गाझियाबादमधून ‘ऑनलाईन गेमिंग (खेळाचे) अ‍ॅप’द्वारे तरुण हिंदु मुलांचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी अन्वेषण चालू असतांनाच नवनवीन खुलासे पुढे येत आहेत. आतापर्यंत ५ राज्यांतून हिंदु तरुणांनी धर्मांतर केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

२. शाहनवाज मकसूद उर्फ बद्दो याच्या ‘कॉल डिटेल रेकॉर्ड’ (सी.डी.आर्.) वरून गेल्या वर्षभरात १०० हून अधिक हिंदु अल्पवयीन तरुण त्याच्या संपर्कात आल्याचे उघड झाले आहे. त्याच्या खात्यात प्रतिमास लाखो रुपये जमा होत असल्याची माहिती बँकेकडून मिळाली आहे. ही रक्कम गुजरात, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, देहली, हरियाणा आणि चंडीगड येथून जमा करण्यात आली आहे.

३. पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, ‘ऑनलाईन गेमिंग (खेळाचे) अ‍ॅप’द्वारे धर्मांतराचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर लोक स्वत: पोलिसांशी संपर्क साधून माहिती देत आहेत.

सौजन्य : India Today

फरिदाबाद आणि चंडीगड येथील हिंदु मुलांचे धर्मांतर

या प्रकरणी संजयनगर येथील मशीद समितीचा माजी सदस्य अब्दुल रहमान याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या चौकशीत या टोळीने फरिदाबाद आणि चंडीगड येथील तरुण मुलांचे धर्मांतर करण्यात आल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांच्या अन्वेषणात गुजरात आणि महाराष्ट्र येथेही धर्मांतर झाल्याचे समोर आले.

बद्दोचा पाकिस्तानशी संबंध !

सुरक्षायंत्रणा आणि पोलीस या धर्मांतर टोळीचा म्होरक्या बद्दो याचा पाकिस्तानशी असलेल्या संबंधाचा शोध घेत आहेत.

ठाणे (महाराष्ट्र)  येथे ४०० हिंदु तरुणांचे धर्मांतर केल्याचा दावा

महाराष्ट्रातील ठाणे येथून पोलिसांना नुकताच दूरध्वनी आला. बुद्दोच्या टोळीने ठाण्यात ४०० जणांचे धर्मांतर केल्याचा दावा दूरध्वनी करणार्‍याने केला आहे. बद्दो याला अटक केल्यानंतर मोठा खुलासा होऊ शकतो, असा दावा त्याने केला आहे.

संपादकीय भूमिका

  • पाकला जन्माची अद्दल घडवल्यास भारतातील अर्ध्याहून अधिक समस्य आपोआप संपतील. पाकवर कारवाई करण्यासाठी भारत सरकार कधी पावले उचलणार ?