ओडिशात पुन्हा झालेल्या अपघातात मालगाडीचे ५ डबे रुळावरून उतरले !

नवी देहली – कोरमंडल एक्सप्रेसच्या नुकत्याच झालेल्या भीषण अपघातानंतर आता ओडिशा राज्यातच आणखी एका रेल्वे अपघाताची बातमी समोर आली आहे.राज्याच्या बारगढ जिल्ह्यातील मेंधापाली गावाजवळ एका खासगी सीमेंट कारखान्याच्या आवारात एका मालगाडीचे ५ डबे रुळावरून उतरले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातात रेल्वे बोर्डाची कोणतीच भूमिका नसून रुळांची सर्व व्यवस्था संबंधित कारखाना करतो, अशी माहिती संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांनी दिली.

कोरोमंडल अपघातातील मृतांची संख्या लपवलेली नाही ! – ओडिशा सरकार

दुसरीकडे कोरमंडल एक्सप्रेसच्या अपघातामध्ये मृत पावलेल्या लोकांची संख्या आम्ही लपवत नसल्याचे स्पष्टीकरण ओडिशा सरकारचे मुख्य सचिव पी.के. जेना यांनी दिली आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की, त्यांच्या राज्यातील अनेक अपघातग्रस्त प्रवाशांचा अजूनही शोध लावता आलेला नाही. या प्रकरणी रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी कोणतीही टिप्पणी केली नाही.

आतापर्यंत मिळालेल्या एकूण २७५ शवांपैकी केवळ १०८ जणांची ओळख पटवता आली आहे. भीषण उष्णतेमुळे शव गतीने सडत असल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण होत असल्याचे मुख्य सचिव जेना यांनी सांगितले. आणखी दोन दिवस ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जाईल, अन्यथा कायद्यानुसार राज्य सरकारच शवांच्या अंतिम संस्कारांची व्यवस्था करील, असेही जेना यांनी स्पष्ट केले.