उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. निर्मयी मांजरेकर ही या पिढीतील एक आहे !
(‘वर्ष २०२० मध्ये चि. निर्मयी मंदार मांजरेकर हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती आणि आता वर्ष २०२३ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५२ टक्के आहे.’ – संकलक)
ज्येष्ठ पोर्णिमा, म्हणजे वटपौर्णिमा (३.६.२०२३) या दिवशी डोंबिवली, ठाणे येथील चि. निर्मयी मंदार मांजरेकर हिचा ४ था वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये आणि आलेली अनुभूती पुढे दिली आहे.
१. व्यवस्थितपणा
‘निर्मयीला घरकामामध्ये साहाय्य करायला आवडते, उदा. वाळलेले कपडे घडी करून ठेवणे, इतरांना काही वस्तू हवी असल्यास लगेच आणून देणे. ती तिची खेळणी खेळून झाल्यावर भरून ठेवते.
२. देवाची आवड
निर्मयी ३ वर्षांची असतांना आमच्या वसाहतीमध्ये सार्वजनिक नवरात्री उत्सव चालू होता. तेव्हा प्रतिदिन तिला मंडपात नेल्यावर ती देवीला भावपूर्ण नमस्कार करायची. तिला देवीला हळद-कुंकू वहायला आवडत असे.
३. देवीची मूर्ती विसर्जनासाठी मंडपातून बाहेर आणल्यावर देवीकडे स्तब्ध आणि भावविभोर होऊन पहाणे
दसर्याच्या दिवशी देवीची मूर्ती विसर्जनासाठी मंडपातून बाहेर आणल्यावर निर्मयी स्तब्ध उभी राहून एकटक देवीकडे बराच वेळ बघत होती. तेव्हा तिचा चेहरा भावविभोर झाला होता आणि तिचे डोळे भरून आले होते. तिचे लक्ष केवळ देवीच्या चेहर्यावरच होते.
४. जिज्ञासू वृत्ती
निर्मयी साडेतीन वर्षांची असतांना मला विचारत होती, ‘‘आई मला खरोखरचा बाप्पा बघायचा आहे.’’ मी तिला ‘डोळे बंद करून नामजप कर. मग बाप्पा दिसेल’, असे सांगितले. तेव्हा ती लगेच तसे करून बघायची. मी विचारले ‘‘कसा दिसतो बाप्पा ?’’, तेव्हा मला बाहेर पडलेले ऊन दाखवत म्हणाली, ‘‘तो बघ तसा आहे. बाप्पा उन्हासारखा दिसतो.’’ तिची निरागसता आणि जिज्ञासू वृत्तीचे मला कौतुक वाटले होते.
५. घरातील एका खोलीत आग लागल्यावर निर्मयीने झोपेत नमस्काराची मुद्रा करणे आणि आगीच्या संकटातून वाचणे
३१.१.२०२२ या दिवशी आम्ही आमच्या गावी सिंधुदुर्गला होतो. तेव्हा आमच्या घरी मध्यरात्री ३ वाजता घरातील खालच्या एका खोलीत ‘शॉर्ट सर्किटने’ आग लागली. आम्ही सगळे वरच्या खोलीत झोपलो होतो. आग लागल्याचे कळताच मी आणि माझे यजमान खाली जाऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागलो. त्या वेळी सगळे आटोक्यात येण्यास दीड घंटा लागला. तेव्हा सासूबाई देवाचा धावा करून नामजप करत बसल्या होत्या. त्या वेळी ‘निर्मयी झोपेतच दोन्ही हात छातीजवळ जोडून नमस्काराची मुद्रा करून झोपली आहे’, असे त्यांना दिसले. त्या वेळी ती झोपेत असूनही तिचा चेहरा वेगळाच जाणवत होता. हे पाहून सासूबाईंची भावजागृती झाली आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ‘आमच्यावर आलेले एवढे मोठे संकट तिला झोपेतच जाणवले. ‘आम्हाला ईश्वराने या संकटातून वाचवले; म्हणून तिनेही ईश्वराला झोपेतच कृतज्ञता व्यक्त केली’, असे सासूबाईंना जाणवले.
‘हे सर्व लिखाण करून घेतले आणि निर्मयीची गुणवैशिष्ट्ये आमच्या लक्षात आणून दिली’, याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. मंजिरी मांजरेकर, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (८.५.२०२३)०
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |