देशाला हादरवणारी बालासोर रेल्वे दुर्घटना २ दिवसांपूर्वी घडली. या दुर्घटनेत अद्यापपर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला, तर १ सहस्रांहून अधिक लोक घायाळ झाले आहेत. कोरोमंडल एक्सप्रेस, मालगाडी आणि बेंगळुरू-हावडा एक्सप्रेस या ३ रेल्वेगाड्यांचा हा अपघात झाला. प्राथमिक चौकशीत ओडिशा येथील बहानगा रेल्वेस्थानकाजवळ एका रूळावर मालगाडी उभी होती. त्या वेळी दुसर्या रूळावरून कोरोमंडल एक्सप्रेस कोलकाता येथे जात होती. त्याच वेळी तिसर्या रूळावरून यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस विरुद्ध दिशेने जात होती. या वेळी कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडी असलेल्या रूळावर वळवली गेली आणि तिने त्याच रूळावर असलेल्या मालगाडीला धडक दिली. यामुळे एक्सप्रेसचे १५ डबे घसरले. काही डबे मालगाडीच्या वर चढले. ४ डबे घसरून दुसर्या रेल्वेरूळावरून जाणार्या यशवंतपूर-हावडा एक्सप्रेसला जाऊन धडकले. त्यामुळे त्या एक्सप्रेसचेही ३ डबे रूळावरून घसरले. या विचित्र अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, उचकटलेले रेल्वेरूळ रेल्वेगाडीच्या बोगीखालचा भाग फोडून गाडीच्या छताला लागले होते.
तिन्ही रेल्वेगाड्या एकमेकांवर आदळल्यानंतर प्रवाशांच्या किंचाळ्यांनी परिसर हादरून गेला होता; मात्र त्याच वेळी स्थानिकांनी पुढाकार घेऊन लोकांना साहाय्य करण्यास चालू केले. ओडिशा राज्य आणि केंद्र सरकार यांनी संयुक्तपणे प्रयत्न करून तातडीने साहाय्य कार्य चालू केले. असे असले, तरी येथे २०० मृतदेह असे आहेत की, त्यांची काहीच ओळख पटू शकलेली नाही.
तंत्रज्ञान प्रगत तरी अपघात कसा ?
भारतात रेल्वेगाड्यांचा अपघात हा काही नवीन विषय नाही; मात्र सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगातही रेल्वेगाड्या एकमेकांना धडकून मोठा अपघात होणे, हे आश्चर्यकारक आहे. रेल्वेचे मोठे दायित्व सांभाळलेले माजी अधिकारी हेसुद्धा हा विषय मान्य करतात. १३ वर्षांपूर्वी ‘अॅँटीकोलीजन’ (एकाच ट्रॅकवर दोन रेल्वे आल्यास त्या वेळी एक यंत्रणा कार्यान्वित होऊन इंजिनमध्ये ‘अलार्म’ वाजून सतर्क केले जाते) यंत्रणा अस्तित्वात आली होती, तर तिचे काय झाले ? तसेच ‘अँटीकोलाईड सिस्टम’ (टक्करविरोधी यंत्रणा) काही वर्षांपूर्वी अस्तित्वात आली आहे. तिचाही उपयोग अजून सर्व गाड्यांमध्ये का करण्यात आला नाही ? अगदी २-३ मासांपूर्वीच रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी भारतीय अभियंत्यांनी बनवलेल्या टक्करविरोधी यंत्रणेचे निरीक्षण रेल्वेच्या इंजिनमध्ये बसून केले आणि त्यांनी भारतीय अभियंत्यांचे अभिनंदही केले; मात्र ती यंत्रणा भारतीय रेल्वेमध्ये केव्हा बसवली जाणार आहे ? हा प्रश्न आहे, म्हणजे सध्या अपघातविरोधी अनेक यंत्रणा रेल्वेमध्ये उपलब्ध आहेत; मात्र त्या अजूनही लागू झालेल्या नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.
दोन्ही रेल्वेच्या घायाळ झालेल्या लोकोपायलटची विधाने आली आहेत. कोरोमंडल एक्सप्रेसच्या लोकोपायलटने सांगितले की, पुढे जाण्यासाठी मी ‘ग्रीन सिग्नल’ पाहिला होता, तर यशवंतपूर एक्सप्रेसच्या लोकोपायलटने सांगितले की, त्याला काही वेगळे आवाज ऐकू आले. जर लोकोपायलटने ‘ग्रीन सिग्नल’ पाहिला होता, तर तो देणार्याची चूक नाही का ? रेल्वेच्या अधिकार्यांनी ‘रेल्वेगाड्यांचा वेग अधिक होता; म्हणून अपघात झालेला नाही, तसेच सिग्नल यंत्रणेत काही दोष होता, असेही नाही’, असे सांगितले. त्यामुळे अपघाताचे दायित्व नेमके कुणाचे ? हे देशवासियांना अद्यापही स्पष्ट झालेले नाही. रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी ‘रेल्वेच्या ‘इंटरलॉकिंग’ यंत्रणेत बिघाड झाल्याने अपघात झाला’, असे सांगितले. मालगाडीत लोखंड असल्यामुळे अपघाताची तीव्रता वाढली, असे म्हटले जात असले, तरी ‘अपघात का घडला ?’ असा प्रश्न आहे. पूर्वी मुंबईमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी रेल्वेचे फाटक ओलांडावे लागे. यामध्ये फाटक उघडण्यातील समन्वय आणि उघडण्याची वेळ यांसाठी पुष्कळ समन्वय करावा लागे. तरीही फाटक ओलांडून चालत जाणार्या लोकांचे अपघात घडत. त्यानंतर रेल्वे पूल, भुयारीमार्ग अशा व्यवस्था आल्यामुळे हे अपघात बर्याच अंशी अल्प झाले. आता ‘बुलेट ट्रेन’, ‘हायपरसॉनिक’ रेल्वे अशा मोठ्या प्रकल्पांची चर्चा केली जाते. अशा वेळी रेल्वे अधिक ‘स्मार्ट’ बनवण्यासह ती सुरक्षित करण्यावरही भर दिला पाहिजे, म्हणजे नवीन तंत्रज्ञान आणण्यासह अस्तित्वात असलेल्या यंत्रणेचे आधुनिकीकरण करणे, ती अद्ययावत करणे यांवर भर दिला पाहिजे, हे या अपघातांतून लक्षात येते.
लोकांचे संघटित प्रयत्न
अपघातात घायाळ झालेल्यांना रक्ताची आवश्यकता होती. तेव्हा बालासोर येथे रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक लोकांनी गर्दी केली. स्थानिकांकडून घायाळांना चांगले सहकार्य करण्यात आले, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. यातून माणुसकी आणि इतरांना साहाय्य करण्याची भारतियांची वृत्ती अजूनही जिवंत आहे, हे लक्षात आले. भारतात रस्ते अपघात झाल्यावर सर्वसाधारणपणे असे लक्षात येते की, जर मालवाहू गाडीचा अपघात झाला असेल, तर लोक घायाळांना साहाय्य करण्याऐवजी वस्तू पळवण्यात पुढाकार घेतात. काही ठिकाणी तर अपघातग्रस्तांचे पैसे, मौल्यवान वस्तू पळवल्या जातात. त्या तुलनेत ओडिशातील स्थानिकांनी दाखवलेली कृती निश्चितपणे माणुसकी दर्शवणारी आहे. आगामी काळात अपघाताच्या व्यतिरिक्त महापूर, भूकंप, अतीवृष्टी अशा अनेक आपत्ती येण्याची शक्यता आहे. या आपत्तींच्या वेळी केवळ सरकार आणि प्रशासन यांच्यावर अवलंबून रहाण्यापेक्षा नागरिकांनी संघटित प्रयत्न करून तिला तोंड देण्यासाठी सक्षम होणे आवश्यक आहे. ओडिशातील नागरिकांप्रमाणे अशा वेळी भारतियांनी पुढाकार घेऊन जनतेला साहाय्य केल्यास आपत्तीमुळे होणारी हानी बर्याच प्रमाणात उणावू शकते, हे निश्चित !
अपघात टाळण्यासाठी यंत्रणेचे सक्षमीकरण आणि दुर्घटनेतील अपघातग्रस्तांच्या साहाय्यासाठी नागरिकांना प्रशिक्षण देणे आवश्यक ! |