ओडिशातील रेल्वे अपघात सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे झाल्याची प्राथमिक माहिती ! – रेल्वे बोर्ड

बालासोर (ओडिशा) – येथील रेल्वे अपघाताविषयी रेल्वे बोर्डाकडून पत्रकार परिषद घेऊन विस्तृत माहिती देण्यात आली. बोर्डाच्या अधिकारी जया सिन्हा यांनी या वेळी सांगितले की, हा अपघात सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे झाला, अशी प्राथमिक माहिती आहे.

जया सिन्हा यांनी सांगितले की,

१. कोरोमंडल एक्सप्रेस सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी बहानगा स्थानकावर येत होती. तिचा अपघात झाला. त्यामुळे स्थानकावर उभी असलेली मालगाडी आणि तिथून जाणार्‍या यशवंतपूर एक्सप्रेस या गाडीचीही हानी झाली.

२. दोन्ही एक्सप्रेससाठी मार्ग आणि सिग्नल ‘सेट’ केले होते. हिरवा सिग्नल होता; म्हणजेच त्यांना मार्ग मोकळा आहे. १३० किमी प्रतिघंटा वेगाने जाण्याची अनुमती असते. कोरोमंडलचा वेग ताशी १२८ किमी, तर यशवंतपूरचा वेग ताशी १२६ किमी होता. सिग्नल हिरवा होता आणि त्यांना थेट जायचे होते. कोरोमंडल एक्सप्रेसला मार्ग मोकळा मिळाला म्हणून ती पुढे गेली, त्याच मार्गावर मालगाडी उभी होती आणि तिला जाऊन ही गाडी धडकली. प्राथमिक माहितीनुसार सिग्नलमध्ये बिघाड आढळून आला. ही प्राथमिक माहिती आहे, सध्या चौकशी चालू आहे. त्याचा अहवाल आल्याखेरीज थेट सांगता येणार नाही.

३. अपघात केवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा झाला. ३ गाड्यांची धडक झाली नाही. एकाच रुळावर तिनही गाड्या आल्या नव्हत्या. केवळ एकाच गाडीचा अपघात झाला. अपघातानंतर ती मालगाडीला धडकली. मालगाडीत लोखंड भरले होते. त्यामुळे या अपघाताची तीव्रता वाढली.

४. कोरोमंडल ही ‘एल्एच्बी रेल्वे आहे. सर्वाधिक सुरक्षित अशी ही गाडी आहे. अशा प्रकारच्या गाड्या अत्यंत गतीने असल्या आणि अपघात झाला तरी गाडीतील प्रवाशांना अधिक दुखापत  होत नाही. आताचा अपघात असा झाला की, मालगाडीत लोखंड होते. या धडकेत मालगाडीची अधिक हानी झाली नाही; मात्र कोरोमंडलचे काही डबे डाऊन लाइनवर घसरले. त्याच वेळी यशवंतपूर एक्सप्रेस ताशी १२६ किमीच्या गतीने जात होती. अवघ्या काही सेकंदासाठी तिचे शेवटचे २ डबे मागे होते त्याला धक्का लागून दोन्ही डबे घसरले. हे इतक्या वेगात होते की, त्यातील काही लोकांना दुखापत झाली आणि काहींचा जीवही गेला.