ओडिशात भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २९० हून अधिक !

  • १ सहस्रांहून अधिक जण घायाळ

  • मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

  • पंतप्रधान मोदी यांनी घटनास्थळी जाऊन केली पहाणी  

अपघातग्रस्त कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी (सौजन्य दिव्य मराठी वृत्तसंकेतस्थळ)

भुवनेश्‍वर (ओडिशा) – कोलकाता येथून चेन्नईला जाणार्‍या कोरोमंडल एक्सप्रेसला २ जूनच्या सायंकाळी ७ च्या सुमारास ओडिशामध्ये मोठा अपघात झाला. ओडिशातील बालासोरपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या बहानगा रेल्वेस्थाजनकाच्या जवळ हा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २९० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ९०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. घसरलेल्या डब्यांत अडकलेल्या प्रवाशांना काढण्याचे काम ३ जूनच्या दुपारपर्यंत चालू होते. तसेच या डब्यांमध्ये अनेक मृतदेह असल्याचेही आढळून आले आहे. त्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. घायाळांना बाहेर काढण्यासह आता घटनास्थळी डबे रुळावरून बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत् केली जाऊ शकते. येथील बचाव कार्यासाठी २ जूनच्या रात्रीपासून स्थानिक आपत्कालीन यंत्रणा, तसेच राष्ट्रीय आपत्कालीन यंत्रणा काम करत आहेत. तसेच येथे ६० हून अधिक रुग्णवाहिका रात्रीपासून कार्यरत होत्या. रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात घायाळांवर उपचार चालू आहेत. घायाळांसाठी आवश्यक असलेले रक्त मिळण्यासाठी रक्तादान करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

कसा झाला अपघात ?

बहानगा रेल्वे स्थानकाजवळ एका रुळावर मालगाडी उभी होती. त्या वेळी दुसर्‍या रुळावरून कोरोमंडल एक्सप्रेस कोलकाता येथे जात होती. त्याच वेळी तिसर्‍या रुळावरून यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस विरुद्ध दिशेने जात होती. या वेळी कोरोमंडल एक्सप्रेस अचानक रुळावरून घसरली. तिचे १५ डबे मालगाडीच्या दिशेने घसरले. काही डबे मालगाडीच्या वर चढले. ४ डबे घसरून दुसर्‍या रेल्वेरुळावरून जाणार्‍या यशवंतपूर-हावडा एक्सप्रेसला जाऊन धडकले. त्यामुळे त्या एक्सप्रेसचेही ३ डबे रुळावरून घसरले. असा हा विचित्र अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस १२५ किलोमिटर प्रतीघंटा गतीने धावत असतांना हा अपघात झाला.

कारण अद्याप स्पष्ट नाही

‘अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचे बारकाईने विश्‍लेषण केले जाईल’, असे रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी सांगितले. घायाळांची काळजी घेणे ही सध्या पहिले प्राधान्य आहे, असेही त्यांनी सांगितले. २ जूनला अपघात झाल्यानंतर मुंबई ते मडगाव धावणार्‍या ‘वन्दे भारत’ ट्रेनच्या लोकार्पणाचा सोहळा रहित करण्यात आला.

बचावकार्यात सैन्याचा सहभाग

अपघाताच्या ठिकाणी भारतीय सैन्याची वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पथके तैनात करण्यात आली आहेत. ईस्टर्न आर्मी कमांडमधील विविध ठिकाणांवरील पथकांना  घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. वायूदलाने २ ‘एम्.आय. १७’ हेलिकॉप्टर बचाव कार्यासाठी तैनात केले आहेत, अशी माहिती संरक्षण दलाच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी दिली.

पंतप्रधान मोदी यांनी केली पहाणी !

या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जूनला सकाळी तातडीची बैठक बोलावली होती.

यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बालासोर येथे जाण्याचे घोषित केले. दुपारी ३ च्या सुमारास त्यांनी बालासोर येथे घटनास्थळी जाऊन पहाणी केली. त्यानंतर त्यांनी अपघातातील घायाळांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संदेश –

राजकारण करण्याची ही वेळ नाही ! – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल  

ओडिशाचा अपघात अत्यंत वेदनादायी आहे. कुठल्याही प्रकारचे राजकारण करण्याची ही वेळ नाही, असे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जी या ओडिशामध्ये आल्या आहेत. त्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी घायाळांची विचारपूसही केली. ‘आमच्या राज्याकडून आम्ही मृतांना ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे. तसेच बंगालहून आम्ही डॉक्टरांचे पथकही पाठवले आहे’, असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी रुग्णालयात जाऊन घायाळांची  विचारपूस केली.

 

हेल्पलाइन क्रमांक : आपत्कालीन नियंत्रण कक्ष : ६७८२२६२२८६