उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. कृष्णाली दर्शन मोरे ही या पिढीतील एक आहे !
दापोली, १ जून (वार्ता.) – येथील सनातनचे साधक श्री. दर्शन मोरे आणि सौ. दूर्वा मोरे यांची मुलगी चि. कृष्णाली दर्शन मोरे (वय १ वर्ष २ मास) ही दैवी बालिका असल्याची घोषणा सद़्गुरु सत्यवान कदम यांनी एका घरगुती कार्यक्रमात केली. सद़्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी दापोली येथील साधक उपस्थित होते.
चि. कृष्णाली दर्शन मोरे हिची तिच्या आई-वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. सतत ध्यानावस्थेत राहून मुद्रा करणे : ‘चि. कृष्णालीच्या दोन्ही हातांची बोटे नामजप करतांना मुद्रा जशी असते, त्याप्रमाणे असतात. ‘ती सतत ध्यानावस्थेत आहेत’, असे आम्हाला वाटते. ती झोपलेली असतांना मधूनच तिची अनाहतचक्रावर हाताची मुद्रा असते.
२. देवाची आवड
अ. ती रडत असतांना देवाचे श्लोक म्हटले किंवा जयघोष केले, तर लगेच रडायचे थांबवते. ती श्लोक आणि जयघोष एकाग्रतेने ऐकते अन् पुन्हा म्हणायला सांगते.
आ. देवाचे श्लोक म्हणायला चालू करताच हात जोडून नमस्कार करते. ‘तिला देवाविषयी पुष्कळ ओढ आहे’, असे आम्हाला सतत जाणवते.
३. सात्त्विकतेची ओढ : ती सनातनच्या कार्यक्रमांच्या वेळी पूर्णवेळ शांत असते. ती सगळ्याचा आनंद घेते आणि आम्हालाही आनंद मिळतो.
४. अनेक वेळा कृष्णालीच्या अंगावर दैवी कण असतात. तिची त्वचा चमकत असते आणि तिचा चेहराही सात्त्विक वाटतो.
५. संतांप्रती भाव : सद़्गुरु सत्यवान कदम यांनी दिलेला खाऊ खातांना तिच्या चेहर्यावर आनंद आणि चैतन्य जाणवते.
६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
अ. ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ पहाण्यासाठी हट्ट करते. ती एकेक पान पहात असतांना त्यावर प्रेमाने हात फिरवते.
आ. आमच्या घरी श्री गुरुपादुकांचे छायाचित्र लावले आहे. कृष्णाली रडत असतांना तिचे हात छायाचित्राला लावताच ती शांत होते.
७. अनुभूती – सद़्गुरु सत्यवानदादांनी ‘कृष्णाली दैवी बालक आहे’, असे सांगितल्यापासून आमचा मांसाहार बंद झाला.’
– सौ. दूर्वा दर्शन मोरे आणि श्री. दर्शन जनार्दन मोरे (चि. कृष्णालीचे आई-वडील), दापोली, जिल्हा रत्नागिरी. (२.३.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |