धर्मराज्‍य पक्षाचे पदाधिकारी अजय जया यांना अटक

ठाणे येथील ‘प्रशांत कॉर्नर’ कारवाई प्रकरणावर केलेला संदेश पडला महागात !

अजय जया (उजवीकडे)

ठाणे ३१ मे (वार्ता.) – खासदार श्रीकांत शिंदे यांच्‍या पत्नीस योग्‍य वागणूक दिली नाही म्‍हणून सुप्रसिद्ध ‘प्रशांत कॉर्नर’ या मिठाईच्‍या दुकानावर ठाणे महानगरपालिकेने कारवाई केल्‍याचा संदेश सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित करणे धर्मराज्‍य पक्षाचे पदाधिकारी अजय जया यांना करणे महागात पडले आहे. अफवा पसरवून आस्‍थापनाची अपकीर्ती केल्‍याप्रकरणी प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी दिलेल्‍या तक्रारीच्‍या आधारे नौपाडा पोलिसांनी गुन्‍हा नोंद करून अजय जया यांना अटक केली आहे. त्‍यांना ठाणे न्‍यायालयात उपस्‍थित केले असता न्‍यायालयाने न्‍यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ठाणे येथील पाचपाखाडी परिसरात ‘प्रशांत कॉर्नर’ हे सुप्रसिद्ध मिठाईचे दुकान आहे. खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांना बसण्‍यासाठी दुकानाबाहेरील भागात एक कट्टा बांधण्‍यात आला होता. तसेच शेड उभारण्‍यात आली होती. हा कट्टा आणि शेड अनधिकृत असल्‍याचे सांगत ठाणे महानगरपालिकेच्‍या पथकाने त्‍यावर कारवाई केली होती; परंतु या दुकानाशेजारी असलेल्‍या इतर दुकानांसमोरही कट्टा आणि शेडचे बांधकाम करण्‍यात आलेले असून त्‍यावर मात्र कारवाई झालेली नव्‍हती. यामुळे सामाजिक माध्‍यमातून वेगवेगळ्‍या प्रतिक्रिया उमटत असतांनाच धर्मराज्‍य पक्षाचे पदाधिकारी अजय जया यांनी सामाजिक माध्‍यमांवर यासंबंधी एक संदेश प्रसारित केला होता. ‘दुकानाबाहेर वाहन उभे करण्‍यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांच्‍या पत्नी वृषाली शिंदे यांचे वाहनचालक आणि दुकानाचे सुरक्षारक्षक यांच्‍यात वाद झाला. त्‍यानंतर दुकानात टोकन घेण्‍यावरूनही त्‍यांचा वाद झाला. त्‍यानंतर खरेदी न करताच त्‍या रागारागाने तडक दुकानाबाहेर निघून गेल्‍या. त्‍यानंतर अवघ्‍या अर्ध्‍या घंट्यात ठाणे महानगरपालिकेच्‍या अतिक्रमणविरोधी पथकाचे कर्मचारी तेथे पोचले आणि त्‍यांनी थेट ‘प्रशांत कॉर्नर’ दुकानाच्‍या बाहेरील शेड आणि इतर बांधकाम उद़्‍ध्‍वस्‍त केले, असा आरोप अजय जया यांनी केला होता’, असे तक्रारीत म्‍हटले आहे.