वस्त्रसंहिता हवीच !

महाराष्ट्र शासनाने वर्ष २०२० मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत वस्त्रसंहिता लागू केली. इतकेच नव्हे, तर देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खासगी आस्थापने, शाळा-महाविद्यालये, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. त्याच धर्तीवर मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार आणि संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या बैठकीत नागपूर जिल्ह्यातील ५ मंदिरांच्या विश्वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. अमरावती, नाशिक यांसह इतर शहरांत असलेल्या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू केली जात आहे. अमरावती येथे ९ मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे, तसेच नाशिक श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी हिंदु संस्कृती आणि परंपरा यांनुसार परिपूर्ण पेहराव करून दर्शनासाठी यावे, गडावर तोकडे कपडे परिधान करण्यास बंदी घालावी, अशा मागणीचा ठराव कळवण ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी सप्तशृंगी देवी विश्वस्तांकडे पाठवला आहे. श्रीक्षेत्र तुळजापूर मंदिर समितीने यापूर्वी वस्त्रसंहितेचा घेतलेला निर्णय तीव्र विरोधामुळे मागे घ्यावा लागला आहे.

शिस्त, पावित्र्य आणि उद्दिष्ट यांच्या पूर्ततेसाठी वस्त्रसंहिता !

मंदिरांतील वस्त्रसंहितेच्या कारणावरून राज्यात अनेक जण टीका करून विनाकारण वाद उफाळून काढत आहेत. जे हिंदुद्रोही आहेत, ज्यांना हिंदुद्वेषाची कावीळ झाली आहे, असे पुरो(अधो)गामी आणि धर्मनिरपेक्षतावादी लोकच वस्त्रसंहितेवर टीका करतात, हे वेगळे सांगायला नको. समाजात व्यावहारिक गोष्टी करतांनाही वस्त्रसंहिता लागू केली जाते. उदा. एखाद्या खासगी आस्थापनात एकाच प्रकारची वस्त्रसंहिता असते, शासकीय कार्यालये, न्यायालये, शाळा येथे वस्त्रसंहिता कोणती असावी ?, याचे नियम घालून दिलेले असतात. मग मंदिरात वस्त्रसंहितेचे नियम घालून दिले, तर इतरांच्या पोटात दुखण्याचे कारण काय ? त्यामुळे मंदिरांमध्येही देवतांची पूजा करतांना आणि वैदिक मंत्रांचा जप करतांना भक्त अन् पुजारी यांना वैदिक शास्त्रांनुसार कुठेही टाके नसलेले एकच वस्त्र घालण्याचा समुपदेश दिला जातो. खरे तर शिस्त, पावित्र्य आणि उद्दिष्ट यांच्या पूर्ततेसाठी वस्त्रसंहिता आवश्यक आहे. मंदिर हे ईश्वराचे पवित्र स्थान आहे. अशा ठिकाणी सात्त्विक पद्धतीची वेशभूषा केल्यास मनुष्याला सात्त्विकतेचा लाभ होऊन त्याचे मन सकारात्मक होते; परंतु दुर्दैवाने ही सात्त्विक पद्धतीची वेशभूषा करण्याची पद्धत मंदिरांमध्ये पाळली जात नाही. ईश्वर हा मानवाच्या आस्थेचे अंतिम स्थान आहे. त्यामुळे त्याचे पावित्र्य राखले जावे, हे जर ईश्वराला मानणार्‍या समुदायाने ठरवले, तर इतरांना त्याचा त्रास का होतो ? हा सर्वस्वी मंदिरांचे संचालन करणार्‍या संस्थेचा प्रश्न आहे. मंदिरांमध्ये आत्मिक सुख आणि मनःशांती मिळवण्यासाठी जाणे, हाच भक्तांचा खरा उद्देश असतो. त्यामुळे अशा पवित्र ठिकाणी जातांना विकृती बाहेर ठेवून गेल्यास फलप्राप्तीचा आनंदही द्विगुणित होऊ शकतो. ‘मांगल्याचे प्रतीक असलेल्या मंदिरात तोकडे कपडे परिधान करून गेल्यास मंदिराच्या पावित्र्याचा भंग होतो’, असे मंदिरांच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक प्रसिद्ध मंदिरांच्या व्यवस्थापनांनी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे संस्कृतीचा होणारा मानभंग आणि विकृत मानसिकता यांना आळा घालण्यासाठी उचललेले पाऊल भविष्यात भक्तांसाठी शिस्तीचा पाठ ठरू शकतात.

पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करून अंगप्रदर्शन करणे, ही काही लोकांची सध्या ‘फॅशन’ झाली आहे. असे अंगप्रदर्शन चित्रपटांतून सर्रास पहायला मिळते. याचा तरुण पिढीवर विकृत परिणाम होऊ लागला आहे. वस्त्रसंहितेचे नियम केवळ मंदिरातच नव्हे, तर समाजात वावरतांनाही पाळले पाहिजेत. आताच्या काळात दूरदर्शन संच, संगणक, भ्रमणभाष, बॉलीवूड, ओटीटी यांमुळे समाजात जी वासनांधता वाढलेली दिसते, त्या काळजीपोटी पालकांचे केवळ एवढेच म्हणणे आहे की, बाहेर जातांना आपली मुलगी आणि पत्नी यांनी व्यवस्थित रहावे. त्यांनी तोकडे कपडे घालू नयेत, कारण तोकड्या कपड्यांमुळे आपल्या मुली अथवा पत्नी यांच्यावर कुठलीही वाईट परिस्थिती ओढवू शकते. मुसलमान समाजामध्ये स्त्रियांना बुरखा घालणे बंधनकारक असते; पण मुसलमान स्त्रियांची कधीच त्याविषयी तक्रार नसते. उलट त्या स्वतःच धर्माचा भाग म्हणून पूर्ण बुरखा घालणे पसंत करतात. दुसरीकडे हिंदु धर्मातील मुलींना ‘शरीरभर कपडे घाला’ म्हटल्यावर राग येतो. ‘आपल्याला कपडे घालण्याचे स्वातंत्र्य नाही, महिला हक्कांवर गदा आणली जात आहे’, अशी आवई उठवली जाते. ब्रिटनमध्ये ‘तोकडे कपडे परिधान केल्यामुळे मुली आणि स्त्रिया यांच्यावर अधिक प्रमाणात बलात्कार होतात’, असा निष्कर्ष पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये काढला. त्यानंतर त्या पोलिसांवर जगभरातून टीका झाली. ब्रिटनच्या पोलिसांनी काढलेला निष्कर्ष खरा होता. तोकड्या कपड्यांमुळे वासनांधता वाढून बलात्काराच्या प्रमाणात वाढ होते, हे आता सर्वांना मान्य होऊ लागले आहे.

जेव्हा उत्तर-पश्चिम भारतात इस्लामी आक्रमणे चालू झाली, तेव्हा वस्त्रसंहितेच्या या मुक्त उत्साही प्रकारावर आक्रमण झाले. संस्कृतीशी नाळ तुटल्याने आपण जगावेगळे फेकलो गेलो. सुसंस्कृत सभ्यतेमुळे आमच्या पूर्वजांनी एकेकाळी जगावर राज्य केले. त्या संस्कृतीचा विसर पडल्याने समाज शक्तीहीन झाला, हे एक वास्तव आहे. त्यामुळे जर आता संस्कृतीच्या शक्ती संपन्नतेसाठी कुणी पुढाकार घेत असेल, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. वैदिक तत्त्वज्ञानानुसार देवाशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी मंदिर आहे. वैदिक तत्त्वज्ञान आदर दाखवण्यासाठी आदरणीय व्यक्तीसमोर नग्न (अर्धनग्न) होण्यास प्रोत्साहन देत नाही. जर कुणाकडे अशा विकृत प्रथा असतील, तर ते त्यांच्या घरात करू शकतात !

वस्त्रसंहितेचे नियम केवळ मंदिरातच नव्हे, तर समाजात वावरतांनाही पाळले पाहिजेत !