आज छत्रपती संभाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. त्या निमित्ताने…
‘शंभूराजांविषयी विविध आक्षेप घेतले जातात. त्यांपैकी महत्त्वाचा अपसमज म्हणजे ते २ वर्षे दिलेरखानाच्या छावणीत होते, म्हणजेच ते मोगलांना जाऊन मिळाले होते. आजही हा अपसमज मोठ्या प्रमाणात कळत नकळत पसरवला जातो. याविषयी भारताचार्य प्रा. सुरेश ग. शेवडे यांनी विपुल संशोधनानंतर काही निष्कर्ष मांडले आहेत. ते त्यांच्याच शब्दांत येथे पाहूया !
१. शंभूराजांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिक्षा का केली नाही ?
‘बालपणापासून छत्रपती शिवरायांच्या तालमीत सिद्ध झालेला, आक्रमणाचा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवलेला, प्रजाजनांच्या कळवळ्यामुळेच मंत्र्यांनाही अप्रिय होण्याची तमा न बाळगणारा, विद्वान, बुद्धीमान आणि सामर्थ्यसंपन्न असलेला युवराज आपल्या जीवनाची अखेरही दैदीप्यमान हौतात्म्यानेच करतो. तो महापुरुष स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना सोडून बंड करण्यासाठी मोगलांना मिळेल, हे पटत नाही आणि ते जर खरे असेल, तर तो आल्यानंतर केवळ ‘लेकरा चुकला होतास, बरे झाले परत आलास’, म्हणून त्याचा राष्ट्रघातकी, देशद्रोही गुन्हा क्षमा करून पुत्रप्रेमाने छत्रपती शिवाजी महाराज त्याला जवळ करतात, त्याला शिक्षा करत नाहीत, हेही पटत नाही. रांझ्याच्या पाटलाला एका बाईशी केलेल्या वाह्यात वर्तनामुळे हातपाय तोडून टाकण्याची शिक्षा देणारा, चंद्रराव मोरे यांचा शिरच्छेद करणारा, खंडोजी खोपड्याचे हातपाय तोडणारा, बेलवडीच्या ठाणेदारीणीशी रायगडच्या तुरुंगात लगट करण्याच्या प्रयत्नाविषयी स्वतःचा मेहुणा सखुजी गायकवाड याचे डोळे काढणारा कठोर न्यायी राजा शंभूराजांच्या अक्षम्य गुन्ह्याविषयी पुत्रप्रेमापायी काही शिक्षा करत नाही, हे आमच्या मनात ठसलेल्या छत्रपती शिवाजी राजांना शोभत नाही.
२. फुटण्याचे राजकारण !
छत्रपती शिवाजी महाराज ६० सहस्र मावळ्यांना सोबत घेऊन कर्नाटक स्वारीवर गेले होते. बंडच करायचे होते, तर अशी सुवर्णसंधी पुन्हा कधी मिळणार होती ?; पण शंभूराजांनी पत्रव्यवहारांत वेळ काढला आणि महाराज येईपर्यंत मोगलांचे आक्रमण होऊ दिले नाही. एप्रिल १६७८ मध्ये महाराज दक्षिणेच्या स्वारीवरून परत प्रथम पन्हाळ्यालाच आले. त्या वेळी शंभूराजांनी हा सारा वृत्तांत महाराजांना सांगितला असला पाहिजे. मोगली सेनेत फितुरीच्या आमिषाने जाऊन तिचे सामर्थ्य जवळून समजून घेऊन, जमल्यास त्यांना झुलवत ठेवण्याचा डाव महाराजांचाच असावा; कारण महाराज पावणे दोन वर्षे ६० सहस्र मंडळींसह महाराष्ट्राबाहेर होते. सेनेलाही विश्रांती देणे आवश्यक होते. याखेरीज मिळवून आणलेल्या द्रव्याची व्यवस्था लावणे आणि नव्याने शस्त्रास्त्रे सिद्ध करणे, यासाठी उसंत हवी होती; म्हणून बंडखोरीचा आव आणून दिलेरखानाला मिळण्याची ही कामगिरी महाराजांनीच शंभूराजांवर सोपवली. त्यानंतर महाराज रायगडास गेले. महाराजांच्या मागोमाग शंभूराजे गेले नाहीत; पण महाराजांच्या गुप्त सूचना शंभूराजांना मिळालेल्याच असणार. अखेर महाराजांच्या सूचनेनुसार शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाले. काही इतिहासकारांचा आक्षेप असा आहे की, शंभूराजांची पत्रे हाच फुटून निघाल्याचा पुरावा आहे. आमचे म्हणणे एवढेच की, जर शंभूराजांना आम्ही म्हणतो, तसे खोटे खोटेच सामील होण्याचे नाटक करून मोगली सेनेचे आक्रमण टाळण्याचा हेतू होता, तर त्यांनी पत्रात काय लिहिले असते ? ‘आम्ही आपल्यात शिरून कारस्थाने करू इच्छितो’, असे लिहिले असते का ?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजापूरकरांशी सख्य केले आणि आपली सेना घेऊन प्रदेश जिंकत महाराज जालन्यापर्यंत येऊन पोचले. शंभूराजांनी नाटक उत्तम वठवले. लवकरच योग्य संधी साधून शंभूराजांनी मोगली चाकरीला रामराम ठोकला. ‘या दुष्ट राक्षसांना नामशेष करणे हेच आपले जीवितकार्य’, असा निश्चय करून ते १.१२.१६७९ या दिवशी बाहेर पडले आणि तडक पन्हाळ्याला परतले.
३. छत्रपती शिवरायांचे पत्राचे नाटक !
छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांचा सावत्र भाऊ व्यंकोजी यास पत्र लिहून कळवले, ‘….चिरंजीव राजश्री संभाजीराजे मोगलाईत गेले होते. त्याला आणावयाचा उपाय बहुत प्रकारे केला. त्यासही कळो आले की, ये पातशाहीत अगर विजापूरचे अगर भागानगरचे पातशाहीत आपले मनोगतानुसार चालणार नाही. ऐसे जाणोन त्याणी आमचे लिहिण्यावरून स्वार होऊन आले. त्यांची आमची भेट झाली. घरोब्याचे रीतीने जैसे समाधान करू ये तैसे केले.’
आता या पत्रावरून शंभूराजे स्वेच्छेने स्वराज्य सोडून गेले होते, हे स्पष्ट दिसते. तसेच हे खुद्द महाराजांचे स्वत:चे पत्र आहे. मग ? यावरही आमचे उत्तर असे की, हे पत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज राजकारण धुरंधर होते. त्यांचे राजकारण अत्यंत वेगळे होते. ते जिकडे जातो म्हणत, तिकडे जात नसत. गणदेवीला जाण्याचे घोषित केले आणि सुरतेला गेले. यालाच राजकारण म्हणतात. छत्रपती शिवरायांचे राजकारण हिमनगासारखे होते. त्याचे वर दिसणारे टोक खालचा आकार किती प्रचंड आहे, हे कळू देत नाही, त्याप्रमाणेच महाराजांचे राजकारणी धोरण असे. आगर्याहून परतल्यावर शंभूराजे मृत्यू पावल्याची कंडी त्यांनीच पिकवली होती.
‘शंभूराजे स्वराज्याला सोडून गेले होते’, हेच सकृत् दर्शनी सर्वत्र प्रसारित करायचे होते, तरच त्यांचे काम ते उत्तम प्रकारे करू शकले असते आणि मोगलांचा विश्वास संपादन करू शकले असते.
४. …तर आजचे नेते आणि छत्रपती शिवराय यांच्यात भेद कोणता ?
सर्वांत महत्त्वाचे सूत्र हे आहे की, खरोखरच स्वराज्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे हे शंभूराजांचे कर्म असते, तर छत्रपती शिवरायांनी त्यांचा निश्चित शिरच्छेद वा कडेलोट केला असता. त्यांना कठोर शिक्षा केली असती. केवळ आपला मुलगा म्हणून त्याची गय केली असेल, तर आजचे नेते आणि छत्रपती शिवराय यांच्यामध्ये कोणता भेद करता येईल ?
म्हणून आमचा निष्कर्ष स्पष्टपणे असा आहे की, दक्षिणेच्या स्वारीवर जातांना महाराजांनी शंभूराजांवर मोगलांशी लाडीगोडीचे संबंध निर्माण करून त्यांना थोपवून ठेवण्याची कामगिरी दिली होती. ती २ वर्षे त्यांनी यशस्वी केली. २ वर्षांनी महाराज परतले. आता अंतरंग भेदाचे काम महाराजांनी सोपवले. शंभूराजे आपल्याला सोडून गेल्याचे नाटक केले आणि काम होताच त्यांना परत बोलावले. ते आल्यावर सर्व लोकांसमोर ‘लेकरा, चुकला होतास. बरे झाले परत आलास. मला सोडू नको. औरंगजेबाचा आतला दावा तुजला दगा करावयाचा होता. परंतु श्रीने कृपा करून सोडून आणिला. थोर कार्य झाले.’, असे महाराज बोलले, हेही नाटकच !
हे कारस्थान इतके गुप्तपणे झाले की, महाराजांजवळ वावरणार्या कवी, विद्वान, राजकारणी यांनाही याचा मागमूस लागला नाही. राष्ट्रकार्यासाठी जीवनभर झगडणारे, राष्ट्रकार्यात मृत्यूही पत्करणारे आणि राष्ट्रकार्यासाठी राष्ट्रद्रोहाच्या पातकाचा कलंक ३०० वर्षांहून अधिक वर्षे आपल्या कीर्तीवर सहन करणारे धन्य ते शंभूराजे !’
लेखक : भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे
(साभार : ‘शंभूराजे’ ग्रंथातून )’