नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर १९ राजकीय पक्षांचा बहिष्कार

पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्याची मागणी

नवीन संसद भवन

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ मे या दिवशी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत; मात्र या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्याची मागणी करत देशातील १९ विरोधी पक्षांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ही माहिती दिली. काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रविड प्रगती संघ), राष्ट्रीय जनता दल, जनता दल (संयुक्त), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, समाजवादी पक्ष, उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, केरला काँग्रेस मणी, विदुथलाई चिरुथाईगल कच्छी, राष्ट्रीय लोक दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स आणि क्रांतिकारी समाजवादी पक्ष, मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्रग आदी पक्ष या कार्यक्रमात सहभागी होणार नाही.

या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, या संदर्भात विरोधकांकडून राजकारण केले जाणार हे ठाऊक होते; पण आम्ही सर्वांना आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे.

नवीन संसद भवनात राजदंड ठेवणार

अमित शहा म्हणाले की, नव्या संसदेत राजदंड ठेवण्यात येणार आहे. ज्या दिवशी संसद राष्ट्राला समर्पित होईल, त्या दिवशी तामिळनाडूत आलेले विद्वान हा राजदंड पंतप्रधानांना देतील. तो संसदेत ठेवला जाईल. यापूर्वी हा राजदंड प्रयागराज येथील संग्रहालयात ठेवण्यात आला होता.

नवीन संसदेसाठी ८६२ कोटी रुपये खर्च

संसदेची जुनी इमारत ४७ सहस्र ५०० चौरस मीटरमध्ये, तर नवीन इमारत ६४ सहस्र ५०० चौरस मीटरमध्ये बांधण्यात आली आहे. नवीन संसद भवन ४ मजली आहे. त्याला ३ प्रवेशद्वार आहेत. त्यांना ‘ज्ञान द्वार’, ‘शक्ती द्वार’ आणि ‘कर्म द्वार’ अशी नावे आहेत. खासदार आणि अतीमहनीय व्यक्ती यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आहे. या इमारतीवर भूकंपाचा परिणाम होणार नाही.या इमारतीचे शिल्पकार बिमल पटेल आहेत. या इमारतीच्या निर्मितीसाठी ८६२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. अवघ्या २८ मासांत ही इमारत बांधण्यात आली आहे. या संसदेत आसन क्षमता जुन्या संसद भवनापेक्षा अधिक आहे. सध्या लोकसभेची आसनक्षमता ५९० आहे. नवीन लोकसभेत ८८८ जागा आहेत आणि ३३६ पेक्षा अधिक लोक दर्शक म्हणून येथे बसू शकतात. सध्या राज्यसभेची आसनक्षमता २८० आहे. नवीन राज्यसभेत ३८४ जागा आहेत आणि दर्शकांसाठी ३३६ पेक्षा अधिक जागा आहेत.

सध्याचे संसद भवन ९६ वर्षांपूर्वी म्हणजे वर्ष १९२७ मध्ये बांधण्यात आले होते. मार्च २०२० मध्ये सरकारने संसदेत सांगितले की, जुनी इमारत अधिक वापरण्यात आली होती आणि ती खराब होत आहे. यासोबतच लोकसभेच्या वाढणार्‍या खासदारांना बसण्यासाठी जुन्या इमारतीत पुरेशी जागा नाही. यासाठी नवीन इमारत बांधण्यात येत आहे.