आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी !
नाशिक – येथील लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांची तक्रार थेट केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे करण्यात आली आहे. जिल्ह्यात जेथे जेथे खरे कार्यरत होते, तेथे तेथे त्यांनी याचप्रकारे १०० कोटी रुपयांची मोठी संपत्ती जमवून अवैध मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्यांच्या संपत्तीची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. खरे प्रकरणामुळे सरकारची प्रतिमा मलीन झाली असून ‘सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही’, असे चित्र पुढे येत आहे. भ्रष्ट अधिकारी आणि शासनकर्ते यांच्या खासगी मालमत्ता जप्त करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
लाचखोर अधिकारी सतीश खरे अखेर निलंबित, दोन दिवसांपूर्वी 30 लाखांची लाच घेताना खरेंना अटक https://t.co/a4rRXMp8mO #nashiknews
— ABP माझा (@abpmajhatv) May 18, 2023
शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात भ्रष्ट अधिकार्यांना रंगेहात पकडण्याची मालिकाच चालू आहे. ५ लाखांपासून ते ३० लाख रुपयांची लाच घेण्यापर्यंत अधिकार्यांची मजल गेली आहे. फार थोडे तक्रारदार पुढे येतात. त्यातील काही सापळे यशस्वी होतात. तरीही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत.
सौजन्य : ए.बी.पी. माझा
सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही. राजकीय शक्ती आणि अधिकारी सामान्यांची कायदेशीर कामे करण्यासाठी अडवणूक करून लूट करतात. ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यात लक्ष घालावे, तसेच भ्रष्ट अधिकार्यांच्या मालमत्ता जप्त करून तो व्यय जनतेला आरोग्य आणि शिक्षण पुरवण्यासाठी करावा’, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम ठोंबरे, अधिवक्त्या वसुधा कराड आणि अधिवक्ता तानाजी जायभावे यांनी केली आहे.