माजी नगरसेवकाच्या मुलाकडून किशोर आवारे यांची हत्या !

वडिलांच्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी हत्या केल्याचे अन्वेषणात निष्पन्न

पुणे – माजी नगरसेवक चंद्रभान खळदे यांच्या विरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार किशोर आवारे यांनी नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याकडे केली होती; मात्र बांधकाम ‘साईट’च्या मार्गालगतची ही वृक्षतोड अनुमतीने केली होती, असा दावा चंद्रभान खळदे यांनी केला होता; मात्र यावरून आवारे यांनी चंद्रभान खळदे यांना सर्वांदेखत कानशिलात लगावली होती. या अपमानाचा सूड घेण्यासाठी त्यांचा मुलगा गौरव खळदे यांनी तळेगावच्या जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस अन्वेषणात समोर आले आहे.

जानेवारीपासूनच गौरवने हत्येचा कट रचायला आरंभ केला होता. हत्या करणार्‍या शाम निगडकरशी त्याची मैत्री होती. गौरव शामला खर्चासाठी पैसे द्यायचा. शामकडून ही हत्या करून घ्यायचे ठरले. आर्थिक साहाय्य करणार्‍या मित्रासाठी शामनेही होकार दिला होता. श्याम आणि रघु उपाख्य प्रवीण धोत्रे सोबत हत्या कशी करायची ? हे ठरवले. शाम आणि प्रवीणने इतर मित्रांना समवेत घेतले. नगर परिषद कार्यालयात किशोर आवारे यांना गाठून त्यांची हत्या करण्यात आली.