ठाणे – माझ्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याप्रकरणी मला न्यायालय किंवा पोलीस यांच्याकडून नोटिसा येतात. त्यांतील भाषा वाचल्यावर ‘मला सोडले आहे कि अटक केली ?’, हेच कळत नाही, इतकी ती भाषा गुंतागुंतीची असते, असे वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविषयी १२ मे या दिवशी ठाणे येथील पत्रकारांशी बोलतांना केले.
या वेळी राज ठाकरे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बराच गोंधळात टाकणारा आहे. ‘विधीमंडळातील गट हा पक्ष समजला जाणार नाही’, असे न्यायालयाने म्हटले. ही गोष्ट झाल्यावर निवडणूक आयोगाने ‘चिन्ह’ आणि ‘पक्षाचे नाव’ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे काय होणार ? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता निवडणूक आयोगाचे काय करणार ? हा निकाल प्रचंड गोंधळात टाकणारा आहे. ही विविध विचारांची धूळ खाली बसल्यावर आपल्या सर्वांना नक्की काय झाले आहे, हे कळेल.’’ महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाविषयी १६ आमदारांच्या पात्र-अपात्रता यांचा निर्णय विधीमंडळ घेईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ११ मे या दिवशी दिला. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केले.