बांगलादेश उच्च न्यायालयाचा निर्णय
ढाका (बांगलादेश) – भारतात बंदी घालण्यात आलेली आतंकवादी संघटना ‘उल्फा’चा प्रमुख परेश बरुआ याची बांगलादेश उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा जन्मठेपेत पालटली आहे. वर्ष २००४ च्या चट्टोग्राम शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात न्यायालयाने हा निर्णय दिला. या प्रकरणात न्यायालयाने बांगलादेशाचे माजी मंत्री लुत्फज्जमान बाबर आणि त्यांचे ५ साथीदार यांची निर्दोष मुक्तता केली. हे प्रकरण भारतविरोधी आतंकवादी संघटनांना १० गाड्यांमध्ये शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पाठवण्याशी संबंधित आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात तणाव वाढला असतांना भारताला हवा असलेला आतंकवादी परेश बरुआ याला दिलेली फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये रूपांतरित केल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक चिघळणार असल्याचे बोलले जात आहे.
१. बांगलादेशात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बी.एन्.पी.) आणि जमात-ए-इस्लामी यांच्या राजवटीत वर्ष २००४ मध्ये शस्त्रास्त्रांचा हा मोठा साठा जप्त करण्यात आला होता.
२. लुत्फज्जमान बाबर यांचा आतंकवादी गटांसमवेत शस्त्र तस्करीत सहभाग असल्याचे पुरावे मिळाले होते. बाबर हे २००१ ते २००६ पर्यंत बांगलादेशाच्या पंतप्रधान खालिदा झिया यांच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते.
३. परेश बरुआ याने वर्ष २००० मध्ये बांगलादेशामध्ये आश्रय घेतला होता. त्याला आश्रय देण्याच्या मोबदल्यात त्याला आणि त्याच्या कुटुंबाला इस्लाम स्वीकारावा लागला होता.
४. आसामला भारतापासून तोडून स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्यासाठी उल्फा या आतंकवादी संघटनेची स्थापना झाली होती.
संपादकीय भूमिकाउद्या बांगलादेश सरकारने बरुआ याची जन्मठेपेची शिक्षा रहित केली किंवा त्याला कारागृहातून आतंकवादी कारवाया करण्यासाठी साहाय्य केले, तर आश्चर्य वाटणार नाही ! |