देहलीचा नेता आणि गल्लीचे राजकारण !

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार

मागील काही दिवस महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. ‘लोक माझे सांगाती’ या स्वत:च्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यानंतर थोड्याच वेळात ‘शरद पवार’ नावाचा ‘ट्विटर ट्रेंड’ संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर पोचला. सर्व प्रसारमाध्यमांची जागा ‘शरद पवार’ या नावाने व्यापली. पक्षावर अद्यापही स्वत:ची पकड आहे, हे दाखवून देण्यासाठी शरद पवार यांनी हे सर्व नाट्य घडवून आणले, हे आता लपून राहिलेले नाही. अजित पवार भाजपच्या ओसरीला जात असल्याची कुणकुण लागताच शरद पवार यांनी ही खेळी केली. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे होऊन भाजपला पाठिंबा दिल्यानंतर ‘शिवसेना’ पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने त्यांना दिले. हीच खेळी भाजपने खेळल्यास भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे जाईल आणि स्वत:ची अवस्था उद्धव ठाकरे गटाप्रमाणे होईल, याची चाहुल लागताच शरद पवार यांनी हे नाट्य घडवून भाजपचा डाव पलटवला अन् अजित पवार यांनाही चितपट केले. पवार यांची ही खेळी म्हणजे त्यांच्यातील धुरंधर राजकारण्याचे द्योतक आहे. पवार यांच्या या डावपेचाचे सर्व माध्यमांतून कौतुक होत असले, तरी आपण आजचे संकट उद्यावर ढकलले आहे, याची जाणीव त्यांना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पवार यांची निवृत्ती अमान्य करून अध्यक्षपद पुन्हा त्यांच्याकडेच दिले. अर्थात् हा सर्व सोपस्कार होता. शरद पवार यांनी अध्यक्षपद स्वत:कडे ठेवले, याचा सरळसरळ अर्थ असा आहे की, त्यांना अध्यक्षपद अजित पवार यांना द्यायचे नाही. अजित पवार यांच्याकडे अध्यक्षपद देऊन पक्षातील फूट टाळता आली असती; परंतु शरद पवार यांना तसे करायचे नाही आणि अजित यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणाकडेही अध्यक्षपद दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट निश्चित आहे, हे शरद पवार जाणतात. ‘पक्षातील फूट टाळण्यासाठी नवीन अध्यक्षांची घोषणा न करता पद स्वत:कडेच ठेवणे’, ही खरे तर शरद पवार यांची नामुष्की आहे. त्यामुळे वरकरणी ‘शरद पवार ही राजकीय खेळी जिंकले’, असे वाटत असले, तरी ‘निवृत्तीच्या वयातही त्यांना धावपळ करावी लागत आहे’, हे त्यांचे अपयश आहे.

स्वत:चा पक्ष फुटीच्या उंबरठ्यापासून वाचवण्यासाठी पक्ष नेत्याने प्रयत्न करणे, यात चुकीचे काहीच नाही. किंबहुना शरद पवार हेच काय, तर अन्य पक्षांच्या नेतृत्वानेही स्वत:चा पक्ष वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला असता. समोर भाजप आणि शिवसेना यांसारख्या तगड्या पक्षांचे आव्हान असतांना त्यांच्या नेत्यांनाही संभ्रमित करणारा राजकीय डाव खेळून पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट सावरली; परंतु अजित पवार यांच्यासह भाजपमध्ये एकूण किती आमदार जाणार होते ? याचे पत्ते अद्यापही देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत, हे पवार यांना चांगलेच ठाऊक आहे.

नाट्याला किती दिवस धूप घालणार ?

शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते

निवृत्तीची घोषणा करून शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी माध्यमांपुढे ‘शरद पवार यांनीच पक्षाचे अध्यक्ष व्हावे’, अशी विनवणी केली. हा सर्व दिखावा आहे. अजित पवार जर भाजपमध्ये जाण्याच्या सिद्धतेत होते, तर त्याच्यासमवेत जाणारे नेतेही याच घोळक्यात होते, हे काही नाकारून चालणार नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या भावनिक नाट्याला ते आणखी किती दिवस धूप घालतील ? हा येणारा काळ ठरवेल. त्यामुळे माध्यमे दाखवत असलेली वृत्ते ही भूलभूलैय्या असून पक्षातील फूट वेळीच रोखणे, हे शरद पवार यांच्या पुढील मोठे आव्हान आहे. पवार यांनी माध्यमांच्या पुढे स्वत:ची चापलुसी करणार्‍या नेत्यांकडून स्वत:चे अध्यक्षपद मान्य करून घेतले; परंतु अजित पवार यांनी राज्यात प्रसारसभा घोषित करून पक्षातील स्वत:चे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न त्वरित चालूही केला आहे. त्यांना कोण रोखणार ? आणि माध्यमांपुढे शरद पवार यांना साद घालणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बुडत्या होडीतच रहाणार कि अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारणार ? हा येणारा काळच ठरवेल.

दांडग्या अनुभवाचा कुपमंडूकपणा !

शरद पवार हे महाराष्ट्राचे ४ वेळा मुख्यमंत्री होते. देशाचे कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री अशी महत्त्वाची पदे त्यांनी समर्थपणे पेलली आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सद्यःस्थितीत पवार यांच्यासारखा दांडग्या अनुभवाचा नेता एखाद-दुसरा असेल. पवार यांनी या वयात खरे तर नवीन नेतृत्वाला सिद्ध करणे अपेक्षित होते. स्वत:च्या हयातीत नवीन नेतृत्वाला स्थिर करण्यासाठी खरे तर त्यांनी वेळ देणे अपेक्षित होते. पवार यांच्याप्रमाणे नेतृत्व असलेला नेता राष्ट्रवादी पक्षात नाही; परंतु याचा अर्थ असा नव्हे की, पक्षाची धुरा कुणी सांभाळू शकत नाही. कधी ना कधी हे करावेच लागणार आहे; पण असा विश्वासू नेता पवार घडवू शकले नाहीत. उलट अशा डझनभर नेत्यांची नावे सांगता येतील की, ज्यांचा केवळ शरद पवार यांनी वापर करून घेतला. सर्वच पक्षांना चांगले नेतृत्व लाभेलच असे नाही; परंतु कधीतरी आपली धुरा पुढच्या नेतृत्वाकडे द्यावी तर लागणारच; पण असा विश्वास पवार यांना कुणाविषयीही वाटत नाही, हे त्यांचे अपयश आहे. त्यामुळे पवार यांनी एका दगडात किती पक्षी मारले ? या माध्यमांच्या बढायांमध्ये अडकण्याऐवजी शरद पवार यांनी आता तरी आपण कुठे अपयशी ठरलो ? याचे अवलोकन करावे. देशाची धुरा सांभाळू शकेल, अशी क्षमता असलेला हा नेता अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, संकुचित आणि वजाबाकीचे राजकारण यांमुळे सरत्या वयातही गल्लीच्या राजकारणातच अडकला, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

उतारवयात स्वत:कडे अध्यक्षपद घेऊन प्रसार करावा लागणे, ही शरद पवार यांची नामुष्की नव्हे का ?