रशियातील खासगी सैन्य राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या विरोधात बंड करू शकते ! – रशियाच्याच कमांडरचा दावा

मॉस्को (रशिया) – रशियाचे कमांडर इगोर गिरकिन यांनी दावा केला आहे की, सैन्याकडून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात बंडखोरी केली जाऊ शकते. ही बंडखोरी वॅगनर गट करू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. वॅगनर गट हे रशियाचे खासगी सैन्य आहे. या सैन्याचे प्रमुख येवेगेनी प्रिगोझिन यांनी नुकतीच धमकी  देतांना ‘आमचे सैन्य युक्रेनमधील बाखमुत भागातून माघार घेऊ शकते’, असे म्हटले होते. प्रिगोझिन यांनी आरोप केला होता की, त्यांच्या सैनिकांना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून कोणतेही साहाय्य मिळत नाही.

१. कमांडर इगोर गिरकिन पुढे म्हणाले की, प्रिगोझिन यांनी यापूर्वी संरक्षण मंत्रालयावर टीका केली आहे. जर ते त्यांचे सैन्य बाखमुत येथून मागे घेत असतील, तर तो बंडच ठरेल. असा बंड रशियासाठी विनाशकारी ठरू शकतो.

२. प्रिगोझिन हे पूर्वी पुतिन यांच्या जवळचे मानले जात होते. तेे कट्टरवादी म्हणून रशियामध्ये लोकप्रिय आहेत. युक्रेन युद्ध संपत नसल्याने प्रिगोझिन त्यांच्या भूमिकेमुळे एक शक्तीशाली नेता म्हणून उदयाला येत आहेत.

३. युक्रेनच्या बाखमुत येथे सध्या भीषण युद्ध चालू आहे. येथे रशियाच्या सैन्याची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. युक्रेनचे सैन्य रशियावर भारी पडत आहे.