राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी मातीचे सर्वेक्षण !

प्रकल्पाविषयी गैरसमज दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बैठक


रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी सध्या माती सर्वेक्षण चालू आहे. या सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला आहे. प्रकल्पाविषयी ग्रामस्थांमधील गैरसमज आणि विरोध दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ग्रामस्थांना बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. ही बैठक २७ एप्रिलला दुपारी साडेचार वाजता राजापूर येथे होणार होती. आता ही बैठक उशिरा चालू झाली असून या बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पर्यावरण तज्ञ, रिफायनरी विरोधक आणि ग्रामस्थ उपस्थित राहिले आहेत. या बैठकीतील चर्चेनंतर बारसू प्रकरणी काय निर्णय होतो, याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे.

प्रकल्पाच्या विरोधातील संघटनेच्या पदाधिकार्‍यांवरील नोटीसा मागे घेण्यात आल्यासच बैठकीला बसू ! – आंदोलनकर्त्यांची भूमिका

रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील संघटनेच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांनी या बैठकीचा आमंत्रण द्यावे आणि त्यांच्यावरील नोटिसा मागे घेण्यात याव्यात, तरच आम्ही बैठकीला बसू, अशी या बैठकीविषयी भूमिका आंदोलनकर्ते ग्रामस्थांनी घेतली होती.

भूमीमालकांच्या जागेत होत आहे माती सर्वेक्षणाचे काम !

राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या माती सर्वेक्षणाचे काम चालू आहे. ज्या भूमीमालकांनी प्रकल्पासाठी भूमीचे संमतीपत्र दिले, त्या भूमीमालकांच्या जागेत हे माती सर्वेक्षणाचे काम चालू आहे.

आंदोलकांची जामीनावर मुक्तता

माती सर्वेक्षणाच्या कामात व्यत्यय आणून कामात अडथळा निर्माण करणार्‍या ११० ग्रामस्थ आणि महिला आंदोलकांना पोलिसांनी कह्यात घेतले होते. त्यांच्या विरोधात कलम १४३, १४७, १४९, १८८, ३४१ व ३७ (१३) कारवाई करण्यात आली. त्यांना राजापूर न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची वैयक्तिक जामिनावर मुक्तता केली आहे.