विद्यार्थ्यांकडून ३० वेळा लिहायला लावले ‘मी पैसे आणायला विसरणार नाही’ हे वाक्य !

ठाणे येथील ‘न्यू होरायझन स्कॉलर्स’ शाळेत शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांकडून करून घेतली विचित्र कृती !

ठाणे, २७ एप्रिल (वार्ता.) – येथील घोडबंदर रोड परिसरातील ‘न्यू होरायझन स्कॉलर्स’ या कॉन्व्हेंट माध्यमाच्या शाळेतील एका शिक्षकाने डायरी आणि ओळखपत्र यांचे ३०० रुपये शुल्क न आणणार्‍या ७ – ८ विद्यार्थ्यांकडून ‘मी पैसे आणायला विसरणार नाही’ हे वाक्य ३० वेळा लिहून घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी ‘शाळा व्यवस्थापन आणि संबंधित शिक्षक यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावा’, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे.

१. अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून लिहून घेणे अत्यंत चुकीचे असल्याचे मनसेनेचे ठाणे शहर अध्यक्ष नीलेश वैती यांनी सांगितले. ‘या घटनेमुळे मुलांच्या बालमनावर परिणाम झाला असून दुसर्‍या दिवशी मुले शाळेत जाण्यास सिद्ध नव्हती’, अशी माहिती वैती यांनी दिली. विशेष म्हणजे ‘एका विद्यार्थिनीने अशा प्रकारे लिहिण्यास नकार दिला तेव्हा शिक्षकाने तिला वर्गाच्या एका कोपर्‍यात उभे करण्याची शिक्षा देत हे वाक्य लिहायला सांगितले’, अशी माहिती पालकांनी दिली.

२. एका पालकाने शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप गटावर या घटनेची पोस्ट टाकल्यावर या प्रकाराचा उलगडा झाला. त्यानंतर पालकांनी शाळा व्यवस्थापनाला या घटनेची माहिती दिली. काही पालकांनी उपमुख्याध्यापकांना संपर्क करून याविषयी माहिती दिली.

३. उपमुख्याध्यापकांनी संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे.  या प्रकाराच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली असून ‘शाळा व्यवस्थापन आणि संबंधित शिक्षक यांवर फौजदारी कारवाई करावी’, अशी मागणी त्यांनी कासारवडवली पोलीस ठाणे येथे निवेदन देऊन केली आहे.

संपादकीय भूमिका 

  • पालकांनो, कॉन्व्हेंट शाळांची मानसिकता जाणा !
  • विद्यार्थ्यांवर पैशासाठी दबाव टाकून त्यांच्या बालमनाचा विचारही न करणारे शिक्षक असणार्‍या अशा शाळा विद्यार्थ्यांना काय घडवणार ?