धर्म अभ्‍यासकासह ८ जण पसारच; अफवांमुळेच जमाव जमल्‍याचा ‘एस्.आय.टी.’चा निष्‍कर्ष !

छत्रपती संभाजीनगर येथील दंगलीचे प्रकरण

प्रतिकात्मक चित्र

छत्रपती संभाजीनगर – श्रीरामनवमीच्‍या आदल्‍या रात्री जिन्‍सी येथील किराडपुरा येथे झालेल्‍या दंगलीला २५ दिवस उलटले आहेत. या २५ दिवसांत विशेष अन्‍वेषण पथकाने (‘एस्.आय.टी’ने) ७९ दंगेखोरांना अटक केली आहे. त्‍या रात्री घडलेला संपूर्ण प्रकार हा अफवा पसरल्‍यानेच झाला. त्‍यात प्रामुख्‍याने ‘मारहाण झाल्‍यानंतर एका गटाला पोलिसांनी सोडून दिले. शहागंजमध्‍ये दंगल उसळली आहे,’ अशा आशयाच्‍या ३-४ अफवा प्रामुख्‍याने पसरल्‍या आणि जमाव एकत्र आला, असा प्राथमिक निष्‍कर्ष ‘एस्.आय.टी.’च्‍या आतापर्यंतच्‍या अन्‍वेषणात निघाला आहे; मात्र या अफवा पसरवणार्‍या त्‍या धर्म अभ्‍यासकासह इतर ७-८ जण मात्र अद्यापही पोलिसांच्‍या हाती लागू शकले नाहीत.

२४ फेब्रुवारी या दिवशी शहराच्‍या नामांतरानंतर राजकीय नेत्‍यांच्‍या एकमेकांविरोधातील वादग्रस्‍त वक्‍तव्‍यांमध्‍ये सातत्‍याने वाढ झाली होती. नामांतराच्‍या विरोधात, तसेच समर्थनार्थ आंदोलने झाली, मोर्चे निघाले. आक्षेपार्ह वक्‍तव्‍ये करण्‍यात आली. त्‍यामुळे कट्टर विचारसरणीच्‍या लोकांकडून तरुणांची माथी भडकवली गेली. याचा अपलाभ घेऊन शहरात अनुचित प्रकार घडेल, असा अंदाज अन्‍वेषण यंत्रणांनी व्‍यक्‍त केला होता. त्‍यानंतरच ३० मार्च या दिवशी किराडपुरा येथे धर्मांधांच्‍या एका गटाकडून आक्रमण करण्‍यात आले.

 

पोलिसांनी ११ अल्‍पवयीन मुलांना नोटीस देऊन सोडले !

‘एस्.आय.टी.’चे प्रमुख वरिष्‍ठ निरीक्षक संभाजी पवार, तसेच अन्‍वेषण अधिकारी अनिल मगरे यांच्‍यासह ९ अधिकारी आणि ३ कर्मचारी अन्‍वेषण करत आहेत. आतापर्यंत ७९ दंगेखोरांना अटक झाली असून एका संशयिताची चौकशी चालू आहे. यात ११ अल्‍पवयीन असून त्‍यांना नोटीस देऊन सोडण्‍यात आले आहे; मात्र या सर्व दंगेखोरांचे भ्रमणभाष पोलिसांनी जप्‍त केले असून फॉरेन्‍सिक विभागाकडून पडताळणी चालू आहे. या सर्वांचे सबळ पुरावे पथकाने गोळा केले. शिवाय २ वरिष्‍ठ पोलीस अधिकार्‍यांकडून त्‍याची खातरजमा केल्‍यानंतरच अटक केली जात आहे.

जळालेली पोलिसांची वाहने

चौकशीस बोलावताच व्‍हॉट्‍सअ‍ॅप संदेश आणि कॉल हिस्‍ट्री काढून टाकतात !

घटनेत प्रारंभी २ गटांतील वाद पोलिसांनी मिटवले होते; परंतु ७-८ जणांनी उपस्‍थित जमावात अफवा पसरवण्‍याचे काम केले. त्‍यात प्रामुख्‍याने मूळ बीड येथील; परंतु ६ वर्षांपासून जिन्‍सी येथे रहात असलेल्‍या आणि स्‍वत:ला धर्म अभ्‍यासक म्‍हणवणार्‍याचा समावेश आहे. ‘एका गटाच्‍या तरुणांना नाहक मारले, मारेकर्‍यांना पोलिसांनी मंदिरात लपवले, शहागंजमध्‍ये दंगल उसळली आहे,’ अशा अफवा पसरवून तरुणांना जमा करण्‍यात आले. व्‍हॉट्‍सअ‍ॅपच्‍या माध्‍यमातून ते प्रसारित करण्‍यात आले. अनेकांच्‍या भ्रमणभाषच्‍या अन्‍वेषणात हे स्‍पष्‍टपणे समोर आले. आता पोलीस ठाण्‍यात चौकशीसाठी बोलावले की, प्रत्‍येक जण भ्रमणभाषमधील माहिती आणि व्‍हॉट्‍सअ‍ॅप कॉल हिस्‍ट्री काढून टाकत आहेत.

 

पोलीस लिहिलेल्‍या दुचाकी धर्मांधांनी पेटवल्‍या !

धर्मांधांचा जमाव केवळ मंदिर आणि पोलीस यांनाच लक्ष्य करण्‍यासाठी जमला होता हेही आता निष्‍पन्‍न झाले आहे. परिसरातील बहुतांश वाहने रस्‍त्‍यावर उभी होती; मात्र मंदिरासमोरील पोलिसांच्‍या १२ शासकीय आणि २ कर्मचार्‍यांच्‍या दुचाकी जाळण्‍यात आल्‍या. त्‍या २ दुचाकींवर पोलीस लिहिल्‍यानेच धर्मांधांच्‍या जमावाने त्‍या हेतूपुरस्‍सर जाळल्‍या. अफवांमुळे हा प्रकार झाल्‍यानंतर शहर पोलीस सामाजिक माध्‍यमांच्‍या बाबतीत सतर्क झाले आहेत. आतापर्यंत वादग्रस्‍त पोस्‍ट केल्‍याप्रकरणी पोलीस विभागाने १४ गुन्‍हे नोंद केले असून २२ तरुणांवर प्रतिबंधात्‍मक कारवाई केली आहे.