४ सहस्र शेळ्या-मेंढ्यांची बोटीतून वाहतूक : १६ जणांना केली अटक

बाणकोट (रत्नागिरी) येथे सीमा शुल्क विभागाची कारवाई


रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निघालेली एक संशयास्पद बोट बाणकोटच्या सागरी हद्दीत सीमा शुल्क विभागाच्या पथकाने पकडली. या बोटीतून ४ सहस्र शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक केली जात होती. हे प्रकरण प्राणी तस्करीचे असल्याचे अन्वेषणात उघड झाल्यानंतर या बोटीतील १६ जणांना अटक करण्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त अमित नायब यांनी ही माहिती दिली.

या प्रकरणी सीमा शुल्क विभागाला माहिती समजल्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या पथकाने शोध चालू केला होता. सिंधुदुर्ग येथून निघालेल्या या बोटीचा रजिस्ट्रेशन क्रमांकही पथकाला प्राप्त झाला होता. ५ घंटे शोध घेऊनही ही बोट सापडली नव्हती. त्यानंतर बाणकोट येथे २१ एप्रिलच्या मध्यरात्री किनारपट्टीपासून ७५ नौटिकल मैल अंतरावर ही बोट सापडली; मात्र या बोटीचा रजिस्ट्रेशन क्रमांक वेगळा होता. बोटीत असलेल्या खलाशांकडून सीमा शुल्क पथकाला समाधानकारक माहिती मिळाली नसल्याने १६ जणांना अटक करण्यात आली आहे. बोटीच्या मालकालाही या विषयाची माहिती नसल्याचे अन्वेषणात पुढे आले आहे. आता ही बोट रत्नागिरी जवळील जयगड बंदरात आणण्यात आली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी केली जाणार आहे .