श्रीलंकेत सरकारी स्तरावर हिंदु मंदिरांवर मोठ्या प्रमाणात होत आहेत आक्रमणे !

  • देवतांच्या मूर्तींची तोडफोड अथवा मंदिरांतून मूर्ती गायब होण्याचे होत आहेत प्रकार !

  • पुरातत्व विभागाकडून मंदिरे बंद करून तेथे नासधूस होत असल्याचा हिंदूंचा आरोप !

कोलंबो (श्रीलंका) – गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेतील हिंदु मंदिरांवर आक्रमणे होत असल्याच्या घटना घडत आहेत. यांतर्गत देवतांच्या मूर्तींची तोडफोड होत आहे अथवा काही प्रसंगांत तर मंदिरांतील मूर्ती गायब झाल्याचेही समोर आले आहे. हे सर्व श्रीलंका सरकारच्या पुरातत्व विभागाकडून होत असल्याची माहितीही समोर आली आहे. यावरून तेथील तमिळ हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली असून येथील हिंदु नेत्यांनी २५ एप्रिल या दिवशी  विरोध प्रदर्शन करण्याचे आवाहन केले आहे. देशाचे गतीने ‘सिंहलीकरण’ (बौद्ध असणार्‍या सिंहली समाजाची शक्ती वाढवणे) होत असल्याचा आरोपही ते करत आहेत.

१. श्रीलंकेच्या उत्तरी भागात असलेल्या हिंदूबहुल जाफना शहरात प्रामुख्याने ही आक्रमणे होत असल्याची माहिती ‘द हिंदू’ने प्रकाशित केलेल्या एका अहवालातून समोर आली आहे.

२. येथे काही तमिळी हिंदूंनी एका सार्वजनिक ठिकाणी हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची स्थापना केल्यावरून तेथील पोलिसांनी या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करून मूर्ती हटवण्याची मागणी केली आहे.

३. एकीकडे हिंदु मंदिरांना लक्ष्य केले जात आहे, तर दुसरीकडे हिंदूबहुल असलेल्या उत्तरी श्रीलंकेत नवीन बौद्ध स्थळांच्या संख्येत वृद्धी झाल्याचे पहायला मिळत आहे. या क्षेत्रात हिंदूंनंतर ख्रिस्ती आणि मुसलमानांची संख्या अधिक असून बौद्धांची संख्या त्यांच्याहूनही अल्प आहे.

४. गेल्या काही वर्षांत कुरुन्थुरमलाई, तसेच मुल्लईतिवु येथील अय्यर मंदिरात बौद्ध विहारांच्या संख्येत गतीने वाढ झाली आहे. स्थानिक हिंदूंच्या मते माजी राष्ट्रपती गोटाबया राजपक्षे आणि त्यांच्या परिवाराने सिंहलीकरणाला अधिक बळ दिले. सध्याचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे याकडे कानाडोळा करत आहेत.

तमिळी हिंदूंच्या अधिकारांवरच आक्रमण ! – जाफनाचे आमदार गजेंद्रकुमार पोन्नम्बलम्

गजेंद्रकुमार पोन्नम्बलम्

जाफनाचे आमदार आणि ‘तमिळ नॅशनल पीपल्स फ्रंट’चे नेते गजेंद्रकुमार पोन्नम्बलम् यांनी पूजेसह तमिळी हिंदूंच्या अधिकारांवरही आक्रमण होत असल्याचे म्हटले आहे. ‘तमिळी हिंदू आणि श्रीलंकन सैन्य यांच्यातील युद्धानंतर म्हणजे गेल्या ३ दशकांपासून तेथील सरकारे सातत्याने उत्तर अन् पूर्व श्रीलंकेत ‘सिंहलीकरण’ अभियान गतीने राबवत आहेत’, असेही पोन्नम्बलम् म्हणाले.

कसे समोर आले प्रकरण ?

हिंदूबहुल उत्तर आणि पूर्व श्रीलंकेत पुरातत्व विभागाच्या वाढत्या कारवायांवरून मंदिरांवरील आक्रमणांचा घटनाक्रम समोर आला. सरकारी अधिकार्‍यांनी ऐतिहासिक स्थळांच्या संशोधनाचे कारण देत काही मंदिरांमध्ये हिंदूंना जाण्यापासून प्रतिबंध लादण्यात आला. वावुनिया येथील वेदुक्कुनारिमलाईच्या एका मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेल्या एका हिंदु तरुणाला अटक केल्याची माहिती समोर आल्यावर त्या मंदिरातील मूर्तींची तोडफोड झाल्याचेही समोर आले. गेल्या मासात त्या भागात हिंदूंनी मोठ्या प्रमाणात आंदोलनही केले होते.

संपादकीय भूमिका 

  • श्रीलंकन सरकारकडून होत असलेली आक्रमणे निषेधार्ह असून भारताने श्रीलंका सरकारला यासंदर्भात जाब विचारणे आवश्यक !
  • एरव्ही भारतातील अल्पसंख्यांक मुसलमान अथवा ख्रिस्ती यांच्यावर झालेल्या कथित आक्रमणांवरून हिंदूंना वेठीस धरणारी पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमे श्रीलंकेतील या प्रकारांवर गप्प का ?
  • साधारण ३ वर्षांपूर्वी ‘नागरिकत्व संशोधन कायदा’ आणि ‘राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी’ लागू करून शेजारी राष्ट्रांतून परतलेल्या अल्पसंख्यांक हिंदूंना न्याय देण्याचे प्रयत्न झाले; परंतु या देशांमध्ये असलेल्या मंदिरांचे संरक्षण करण्यासाठी अजूनही काहीच करण्यात आलेले नाही. भारत सरकारने यासंदर्भातही ठोस पावले उचलावीत, असेच हिंदूंना वाटते !