परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्तचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना साधकांना आलेल्‍या अनुभूती

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२९.५.२०२२ या दिवशी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्तचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना देवरुख (जिल्‍हा रत्नागिरी) येथील साधकांना आलेल्‍या अनुभूती येथे देत आहोत.

१. श्री. अण्‍णासाहेब दिवटे (वय ७३ वर्षे)

१. ‘कार्यक्रमाच्‍या वेळी माझे मन एकाग्र झाले होते. त्‍या वेळी माझ्‍या मनात अनावश्‍यक विचार नव्‍हते.

२. कार्यक्रमाच्‍या कालावधीत माझा ‘प.पू. गुरुदेव’, असा नामजप चालू होता.

३. माझ्‍या मनाला प्रसन्‍नता वाटत होती आणि ‘मी वेगळ्‍याच विश्‍वात आहे’, असे मला वाटत होते.

४. ‘या वातावरणातून बाहेर पडू नये’, असे मला वाटत होते. ‘सततच या वातावरणात रहावे’, असा विचार माझ्‍या मनात येत होता.’

२. श्री. विनय वसंत पानवळकर (वय ६१ वर्षे)

१. ‘प.पू. गुरुदेवांच्‍या जन्‍मोत्‍सवाचा कार्यक्रम पहातांना ‘आपण प्रत्‍यक्ष भगवंताच्‍या चरणांशी बसलेलो आहोत’, असे मला जाणवत होते. ज्‍या पद्धतीने गुरुदेवांनी सनातनचा पाया रचला, तो पहातांनाच त्‍यांच्‍यातील ईश्‍वरत्‍वाची जाणीव होत होती. ज्‍या परिपूर्णतेने त्‍यांनी कार्य चालू केले, ती परिपूर्णताच त्‍यांच्‍या अवतारत्‍वाची निश्‍चिती करून देते.

२. या कार्यक्रमातून भावाचे महत्त्व माझ्‍या अंतर्मनावर बिंबले. ईश्‍वरप्राप्‍तीसाठी माझ्‍या बुद्धीचा निश्‍चय पुनश्‍च स्‍थिर झाला. युवा साधक आणि बालसाधक यांच्‍या भावामुळे माझ्‍या मनात गुरुचरणांविषयी अतीव ओढ निर्माण झाली. ‘या पुढील आपल्‍या आयुष्‍याचे ध्‍येय केवळ आणि केवळ गुरुचरणच आहेत’, हे लक्ष्य निश्‍चित झाले.’

३. सौ. नेहा पानवळकर (वय ५५ वर्षे)

१. ‘जन्‍मोत्‍सव सोहळ्‍याच्‍या दिवशी सकाळपासून घरामध्‍ये चैतन्‍य वाटत होते. ‘आज गुरुमाऊलींचे दर्शन होणार’, या जाणिवेनेच माझा भाव जागृत होत होता.

२. कार्यक्रमाच्‍या वेळी गुरुमाऊलींचे दर्शन होताच ‘त्‍यांच्‍याकडून आम्‍हा सर्व साधकांना शक्‍ती मिळत आहे. आमच्‍याभोवती चैतन्‍याचे कवच निर्माण झाले आहे’, असे वाटत होते.’

४. श्री. विनायक श्रीधर फाटक (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ७४ वर्षे)

१. ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचेे दर्शन होताक्षणी माझा भाव जागृत झाला. माझे मन साधनेविषयी पुन्‍हा उत्‍साही झाले.

२. बालसाधकांचे भावस्‍पर्शी विचार ऐकून माझ्‍या डोळ्‍यांतून अक्षरशः पाणी वहात होते.’

५. सौ. गीतांजली फाटक (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, वय ६४ वर्षे)

१. ‘कार्यक्रम चालू झाल्‍यापासून मला जांभया आणि ढेकरा येऊन माझ्‍यावरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण दूर झाले.

२. तरुण आणि बालसाधक यांचे प्रगल्‍भ विचार ऐकून ‘भावजागृतीचे प्रयत्न करणे आवश्‍यक आहे’, याची जाणीव माझ्‍या मनाला तीव्रतेने झाली.’

६. श्री. विलास अप्‍पा पाटील (वय ६३ वर्षे)

१. ‘कार्यक्रमस्‍थळी मला पुष्‍कळ शांत आणि प्रसन्‍न वाटले.

२. दैवी बालसाधकांचे प्रयत्न ऐकून आणि त्‍यांच्‍या मनातील भाव अन् निर्मळता पाहून मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली. त्‍यांच्‍याकडून मला पुष्‍कळ शिकायला मिळाले. त्‍यांचे बोल ऐकतांना मला आतून पुष्‍कळ आनंद जाणवत होता.’

(सर्व सूत्रांचा मास : मे २०२२)

परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त आयोजित करण्‍यात आलेल्‍या ‘हिंदू एकता दिंडी’ची सेवा करतांना मुंबई येथील श्री. बळवंत पाठक यांना आलेल्‍या अनुभूती

श्री. बळवंत पाठक

‘२१.५.२०२२ या दिवशी मुंबईमध्‍ये परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्‍यात आले होते. या दिंडीचा प्रचार १५ दिवस आधीपासून चालू करण्‍यात आला होता. दिंडीचा प्रचार करतांना मला आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

१. हिंदू एकता दिंडीचा प्रचार करण्‍यासाठी आपण केवळ निमित्तमात्र असून सूक्ष्मातून देवता, ऋषिमुनी आणि दिव्‍यात्‍मे ही सेवा करणार असल्‍याचे पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सांगणे

सनातनच्‍या ७४ व्‍या संत पू. (सौ.) संगीता जाधव (वय ५३ वर्षे) यांनी सांगितले, ‘‘विष्‍णुस्‍वरूप गुरुमाऊलींच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) जन्‍मोत्‍सवानिमित्त ‘हिंदू एकता दिंडी’चा प्रचार सूक्ष्मातून सर्व देवता, ऋषिमुनी आणि दिव्‍यात्‍मे हेच करणार आहेत. आपण केवळ निमित्तमात्र या सेवेत तळमळीने सहभागी व्‍हायचे आहे.’’ त्‍या वेळी माझी भावजागृती होऊन मला गुरूंच्‍या सामर्थ्‍याची जाणीव झाली. या वेळी मला ‘देव कृपाळू आहे आणि आपण केवळ कृती केल्‍यावर तो आपल्‍याला माध्‍यम बनवून धर्मप्रचाराची सेवा करून घेतो’, याची जाणीव झाली.

२. ‘देवीदेवता आणि ऋषिमुनी साधकांना कसे साहाय्‍य करतात ?’, याबद्दल जिज्ञासा निर्माण होणे अन् देवतांनी सूक्ष्मातून त्‍याचे उत्तर सांगणे

पू. (सौ.) संगीता जाधवकाकू यांच्‍या मार्गदर्शनामुळे ‘सूक्ष्मातून देवीदेवता, ऋषिमुनी आणि दिव्‍यात्‍मे कसे साहाय्‍य करतात ?’, याबद्दल माझ्‍या मनात जिज्ञासा निर्माण झाली. त्‍या वेळी देवतांनी मला सूक्ष्मातून सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

२ अ. श्री विठ्ठल : मी या हिंदू एकता दिंडीत वारकर्‍यांच्‍या रूपात सहभागी होईन. त्‍याचप्रमाणे विठ्ठल मंदिरातील विश्‍वस्‍त, तसेच भक्‍त, कीर्तनकार, प्रवचनकार आणि भजनी मंडळे यांच्‍या रूपात मी सहभाग घेईन.

२ आ. श्री गणेश : मी गणेशोत्‍सव मंडळांच्‍या माध्‍यमातून, तसेच गणेश मंदिरांतील विश्‍वस्‍त आणि भक्‍त यांच्‍या रूपात सहभाग घेईन.

२ इ. भगवान श्रीकृष्‍ण : मी ‘इस्‍कॉन’ संप्रदायातील भक्‍त, तसेच ‘गोविंदा पथक’ यांच्‍या माध्‍यमातून सहभागी होईन.

२ ई. श्री दुर्गादेवी : मी नवरात्रोत्‍सव मंडळांच्‍या माध्‍यमातून, तसेच देवीच्‍या मंदिरातील विश्‍वस्‍त आणि भक्‍त यांच्‍या रूपात सहभाग घेईन.

२ उ. भगवान दत्तात्रय : मी दत्त मंदिरातील विश्‍वस्‍त, श्री स्‍वामी समर्थ महाराज मठ, श्री गजानन महाराज संप्रदाय, तसेच विविध संप्रदाय यांच्‍या रूपात सहभागी होईन.

२ ऊ. श्री हनुमंत : मी व्‍यायामशाळा, हनुमान मंदिरातील भक्‍त आणि मल्लखांब पथक यांच्‍या माध्‍यमातून सहभाग घेईन.

३. दिंडीत सूक्ष्मातून देवतांचे अस्‍तित्‍व जाणवणे

२१.५.२०२२ या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’ झाली. तेव्‍हा पू. (सौ.) संगीता जाधवकाकू यांनी सांगितल्‍याप्रमाणे दिंडीत सूक्ष्मातून देवतांचे अस्‍तित्‍व मोठ्या प्रमाणात जाणवत होते. त्‍या वेळी ‘श्री गुरूंच्‍या कार्याची महती जगभर पोचवण्‍यासाठी त्‍यांचीच कृपा आणि आशीर्वाद कार्यरत आहे’, असे मला जाणवले.’

– श्री. बळवंत पाठक, मुंबई (२१.६.२०२२)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक