|
सावंतवाडी – आंबोली घाट मार्ग धोकादायक असून या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आल्या आहेत. असे असतांनाही या मार्गावरून रात्रीच्या वेळी अवजड वाहनांची वाहतूक चालू असल्याचे मनसेच्या पदाधिकार्यांनी १९ एप्रिलच्या रात्री अचानक केलेल्या पहाणीत उघड झाले. ‘हा घाट धोकादायक असल्याने त्वरित ही वाहतूक बंद करावी’, अशी मागणी मनसेने केली आहे. मनसेच्या अचानक पहाणीमुळे संबंधित विभागांच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे.
१. आंबोली घाटातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्याच्या सूचनेकडे पोलीस, महसूल विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग दुर्लक्ष करत आहेत. आर्थिक लाभासाठी संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने ही अवजड वाहतूक चालूच आहे. हा घाट धोकादायक असल्याने ही वाहतूक बंद करावी, अशी मागणी मनसेने केली होती.
२. १९ एप्रिल या दिवशी रात्री घाटातून जाणार्या वाहनांची तपासणी केली असता कर्नाटक, तसेच अन्य राज्यांतील नोंदणी झालेल्या ‘ओव्हरलोड’ गाड्या या घाटातून जात असल्याचे दिसले. काही वाहने मागच्या दिनांकाची अनुज्ञप्ती घेऊन वाहतूक करतांना आढळली, तर काही वाहनांमध्ये अनुमतीपेक्षा अधिक साहित्याची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.
३. हा प्रकार संबंधित विभागांच्या संगनमताने चालू आहे. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकार्यांची भूमिका काय असेल ? संबधितांवर कारवाई केली जाणार का ? असे प्रश्न मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, कुडाळचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, अमोल जंगले, शुभम सावंत आदींनी उपस्थित केले आहेत.
मनसेने आवाज उठवल्यानंतर पोलिसांकडून १८ ट्रकांवर कारवाई
सावंतवाडी – आंबोली घाटातून होणार्या अवजड वाहतुकीच्या विरोधात मनसेने आवाज उठवल्यांनतर २० एप्रिल या दिवशी पोलिसांनी चिरे, तसेच अन्य साहित्याची क्षमतेहून अधिक वाहतूक करणार्या १८ ट्रकांवर आंबोली येथे कारवाई केली. (नाक दाबले की, तोंड उघडते, ही म्हण सार्थ करणारी पोलिसांची कारवाई ! मनसेने आवाज उठवण्यापूर्वी पोलिसांना ही अवजड वाहतूक दिसत नव्हती कि जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात होते ? – संपादक)
आंबोली घाट, बेकायदेशीर अवजड वाहतुकीचा धनी कोण…?
(सौजन्य : sanvad media)
संपादकीय भूमिका
|