‘ज्ञानप्राप्तीची जिज्ञासा’ आणि ‘शिकण्याची तीव्र तळमळ’ असल्याने शारीरिक अपंगत्वावर मात करून ग्रंथप्रदर्शन स्थळी आलेले एक जिज्ञासू !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘वर्ष २०२२ मध्ये एका जिल्ह्यात नवरात्रीनिमित्त सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाला एका जिज्ञासू व्यक्तीने भेट दिली. त्या व्यक्तीशी संवाद साधतांना साधकांच्या असे लक्षात आले की, त्या व्यक्तीला ऐकायला आणि बोलायला येत नाही. असे असूनही सनातनचे ग्रंथ बघण्याची तिला पुष्कळ उत्सुकता आणि जिज्ञासा होती. संवाद साधता येत नसल्याने त्या व्यक्तीने तिच्या मनातील शंका भ्रमणभाषमध्ये लिहून प्रदर्शनात सेवा करणार्‍या साधकांना दाखवल्या. साधकांनी वहीत लिहून त्यांचे शंकानिरसन केल्यावर तिने काही ग्रंथ आणि लघुग्रंथ विकत घेतले. दैनिक ‘सनातन प्रभात’ची माहिती कळल्यावर ते जिज्ञासू दैनिकाचे वर्गणीदारही झाले.

त्या जिज्ञासूमध्ये अध्यात्माविषयी तीव्र जिज्ञासा आणि ज्ञान मिळवण्याची तळमळही होती. त्यामुळे त्यांनी लगेचच ग्रंथ खरेदी केले. ऐकणे आणि बोलणे यांना मर्यादा असूनही त्यांनी भ्रमणभाषच्या माध्यमातून स्वत:चे शंकानिरसन करून घेतले, हेही कौतुकास्पद आहे. अध्यात्मात ‘तळमळ’ आणि ‘जिज्ञासू वृत्ती’ या गुणांना अत्यंत महत्त्व आहे.

या उदाहरणातून सनातनचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे ‘जिज्ञासू हाच ज्ञानाचा खरा अधिकारी आहे !’, हे वचन किती सत्य आहे, हे लक्षात येते.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.२.२०२३)