आतंकवाद्यांच्या आक्रमणाच्या भयापोटी उचलण्यात आले पाऊल !
कराची (पाकिस्तान) – ‘जिहादी पाकिस्तान’ आणि ‘चिनी ड्रॅगन’ यांच्या विखारी युतीला पाकमधील नागरिक नाकारत आहेत. या युतीला गेल्या काही वर्षांपासून विरोध होत आहे. त्यातच बलुचिस्तानमध्ये सत्तेत असलेली ‘बलुच लिबरेशन फ्रंट’ संघटना आणि ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ ही आतंकवादी संघटना यांच्यात हातमिळवणी झाल्याने तेथील चिनी लोकांचा जीव धोक्यात आला आहे. यामुळेच कराची पोलिसांनी चिनी नागरिकांचे काही उद्योग बंद केले आहेत. यात एक उपाहारगृह, एक सुपरमार्केट आणि सागरी उत्पादनांची विक्री करणारे आस्थापन यांचा समावेश आहे. ‘ए.एन्.आय.’च्या वृत्तानुसार चिनी नागरिकांवरील आक्रमणांमुळे द्विपक्षीय संबंधांत वितुष्ट येऊ शकते, अशी पाकला भीती आहे.
१. पाकिस्तानी नागरिकांत चीनविरोधी भावना बळकट होत आहे. आर्थिक साहाय्य, नवे व्यवसाय आणि ‘मायनिंग ऑपरेशन्स’च्या नावाखाली चीन पाकिस्तानी जनतेच्या भूमी बळकावत असल्याचा त्यांना संशय आहे. त्यामुळेच तेथील अतिरेकी संघटनाही चिनी नागरिक आणि ‘चीन-पाक आर्थिक सुसज्ज मार्गा’शी संबंधित प्रकल्पांना लक्ष्य करत आहेत.
२. चीनने वारंवार विनंती करूनही पाक अधिकार्यांनी चिनी नागरिकांना सुरक्षा पुरवण्यासाठी कोणतेही विशेष पाऊल उचलले नाही, असा चीनचा आरोप आहे.
३. पाकमधील बिघडत्या कायदा सुव्यवस्थेचा दाखला देत चीनने गेल्या मासातच दूतावासातील वाणिज्य विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याच्या नागरिकांनाही सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता.
४. दुसरीकडे पाक कर्जमाफीसाठी चीनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने कर्जमाफी दिली नाही, तर पाकला काळ्या सूचीत टाकले जाऊ शकते, अशी पाकला भीती आहे.
५. चीनने ‘चीन-पाकिस्तान आर्थिक सुसज्ज मार्ग’ प्रकल्पाद्वारे पाकिस्तानात अनुमाने ६० अब्ज डॉलर्सची (अनुमाने ५ लाख कोटी रुपयांची) गुंतवणूक करण्याची योजना आखली होती. हा प्रकल्प गत अनेक वर्षांपासून चालू असून त्यावर आतापर्यंत ४० अब्ज डॉलर्सचा (३ लाख २८ सहस्र कोटी रुपयांचा) खर्च झाला आहे.
चिनी नागरिकांवर आतापर्यंत झालेली आक्रमणे !
|
संपादकीय भूमिका
|