पाटण (जिल्हा सातारा) येथे शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा ?

पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी !

( संग्रहीत छायाचित्र )

सातारा, १६ एप्रिल (वार्ता.) – विविध समस्यांमुळे पाटण तालुका शासकीय रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या रुग्णालयात रुग्णांना उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांवरील १ मासाची औषधे देणे आवश्यक असतांना केवळ १० किंवा २० दिवसांचीच औषधे दिली जात आहेत. त्यामुळे ‘पाटण तालुका शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे कि काय ?’, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

क्रांतीसिंह नाना पाटील सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या रुग्णांना पूर्ण एक मासाची औषधे तपासणी झाल्यावर दिली जातात; मात्र पाटण तालुका रुग्णालयात वरील प्रकार पहायला मिळत आहे. याविषयी रुग्णांनी रुग्णालयात चौकशी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे मिळेल त्यात समाधान मानून रुग्ण १० किंवा २० दिवसांची औषधे घेऊन घरी परतत आहेत.

याविषयी पाटण तालुका शासकीय रुग्णालयाच्या दूरभाषवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क झाला नाही, तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. पाटण येथील शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे औषधांविषयी चौकशी केली असता ते म्हणाले, ‘‘औषधांचा साठा पूर्ण येतो; मात्र औषधे १० किंवा २० दिवसांचीच दिली जातात, हे सत्य आहे.’’

पाटण तालुका डोंगरी भागात येतो. त्यामुळे अनेक रुग्ण हे मोठी कसरत करून पाटण तालुका शासकीय रुग्णालयात येतात. पूर्ण १ मासाची औषधे मिळाली, तर रुग्णांचा शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास वाचेल, अशी अपेक्षा आहे. सुदैवाने सध्याचे पाटण तालुक्याचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई हेच जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी या समस्येकडे लक्ष दिल्यास पाटण तालुक्याची आरोग्य विभागाची ही समस्या सुटण्यास साहाय्यच होईल, अशी अपेक्षा रुग्ण आणि सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • शासकीय रुग्णालयातच पुरेशी औषधे उपलब्ध नसणे, हे जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचाच प्रकार आहे. याला उत्तरदायी असणाऱ्यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !
  • औषधांचा तुटवडा आहे की, औषधे रुग्णांना न देता त्याचा अन्यत्र उपयोग केला जातो, हेही पहायला हवे !