रत्नागिरी जिल्हा भाजपमय करायचा आहे, या निर्धाराने कामाला लागा !  

भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात मंत्री रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

रवींद्र चव्हाण

रत्नागिरी – मागील निवडणुकीत आपल्याला एकही जागा मिळाली नाही. या जिल्ह्यात आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद सदस्यही आपला नाही. आता आपल्याला विजयाचा संकल्प करायचा आहे. ‘हा जिल्हा भाजपमय करायचा आहे’, या निर्धाराने कामाला लागा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

येथील स्वयंवर मंगल कार्यालयात भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर अधिवक्ता बाबा परुळेकर, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, अभिजित गुरव, प्रमोद अधटराव, अनिकेत पटवर्धन, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी, तालुकाध्यक्ष आणि मंडलप्रमुख उपस्थित होते.

मंत्री रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की,

१.  केंद्रात आणि राज्यात भाजपचे शासन आहे. दोन्ही शासनांकडून सामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. त्याची माहिती सामान्य माणसांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जागरूक झाले पाहिजे.

२. माझा लोकप्रतिनिधी इथे नाही, असे न म्हणता स्वतःच पक्षाचे गावोगावी प्रतिनिधी बना, त्यासाठी सामाजिक माध्यमांचा वापर करा.

३. शिंदे-फडणवीस राज्यशासनाच्या योजनांचा मिळालेला लाभ आणि योजना अन् विकासनिधी दिल्याविषयी ग्रामपंचायतीमध्ये अभिनंदनाचे ठराव करा !

४. रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्यांकरता ५०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. रोजगार देत आहोत.

५. जिल्ह्यात २ लाख ५२ सहस्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिदा मिळाला आहे.

६. ‘शत प्रतिशत भाजप’ हे आपले उद्दिष्ट आहे. किसान सन्मान योजना, नमो योजना, रोजगार संधी, यांसह ‘सबका साथ सबका विकास’ हा मंत्र अमलात आणूनच आपण विजय मिळवू शकतो.

७. ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकार होत असतांना विरोधक सामाजिक माध्यमांद्वारे चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. त्याला प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे.